‘मोठ्या’ पवारांचा फोन आला अन् 'मशिप्र' मंडळाची कार्यकारिणी 'जैसे थे'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 05:00 PM2023-07-03T17:00:28+5:302023-07-03T17:01:18+5:30

अध्यक्षपदी आ. प्रकाश सोळंके तर सरचिटणीसपदी आ. सतीश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.

got a call from Sharad Pawar and the executive of the MSP Mandal's board was 'as it is' | ‘मोठ्या’ पवारांचा फोन आला अन् 'मशिप्र' मंडळाची कार्यकारिणी 'जैसे थे'

‘मोठ्या’ पवारांचा फोन आला अन् 'मशिप्र' मंडळाची कार्यकारिणी 'जैसे थे'

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून नौवलौकिक असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत संपूर्ण कार्यकारिणी 'जैसे थे'च राहिली आहे. अध्यक्षपदी आ. प्रकाश सोळंके तर सरचिटणीसपदी आ. सतीश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी इच्छुक माजी आमदार अमरसिंह पंडित यांना उपाध्यक्षपदावरच समाधान मानावे लागले. सोळंके, चव्हाण यांनी हॅटट्रिक साधली. या निवडणुकीत आ. चव्हाण यांनी केलेली खेळी यशस्वी ठरल्याची चर्चा आहे.

मशिप्र मंडळाच्या २० जून २०२३ ते ९ जून २०२८ या पाच वर्षांच्या कालावधीसाठीच्या नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात रविवारी सकाळी सर्वसाधारण सभा बोलावली होती. अध्यक्षस्थानी आ. प्रकाश सोळंके होते. मागील काही दिवसांपासून धर्मादाय आयुक्तालय, उच्च न्यायालयात या निवडणुकीला आव्हान दिले होते. या अडथळ्यांवर मात करीत विद्यमान सत्ताधाऱ्यांनी पुन्हा सत्ता काबीज केल्याचे स्पष्ट झाले. मंडळाच्या अध्यक्षपदासाठी उपाध्यक्ष असलेले माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मंडळाच्या सर्व सदस्यांच्या गाठीभेटीही घेतल्या होत्या.

मात्र, आषाढीच्या दिवशी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत मंडळाच्या अध्यक्ष, सरचिटणीसपदाविषयी चर्चा करण्यात आली. तेव्हा पवार यांनी अध्यक्षपदाविषयीचा निरोप दोन दिवसांनी देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार संपूर्ण कार्यकारिणीच 'जैसे थे' ठेवण्याच्या सूचना आल्या. त्यानुसार रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आले. या सर्व निवडणुकीत सरचिटणीस आ. चव्हाण यांनी खेळलेली खेळी यशस्वी ठरल्याचेही स्पष्ट झाले. सलग तिसऱ्यांदा त्यांच्या गटाची सत्ता स्थापन झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. दीपक पडवळे व ॲड. शैलेंद्र गंगाखेडकर यांनी काम पाहिले.

'मशिप्रमं'ची नवनियुक्त कार्यकारिणी
अध्यक्षपदी आ. प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष अमरसिंह पंडित, शेख सलीम शेख अहमद, सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, सहचिटणीस अनिल नखाते, प्रभाकर पालोदकर, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर आणि केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी लक्ष्मणराव मनाळ, मोहनराव सावंत, हेमंत जामकर, विवेकानंद भोसले, आप्पासाहेब पाटील, भारत सोळंके, त्रिंबकराव पाथ्रीकर, दत्तात्रय पाटील, डॉ. प्रकाश भांडवलदार, विश्वास पाटील, विजयकुमार साळुंके, कल्याण तुपे, जयसिंह सोळंके, विश्वास येळीकर यांचा समावेश आहे.

विरोधकांनी नोंदवला आक्षेप
मंडळाच्या सर्वसाधारण सभेत सदस्य मानसिंग पवार, पद्माकरराव मुळे, अजित मुळे, रणजित मुळे, डॉ. पानसंबळ यांच्यासह इतरांनी ही निवडणूक बेकायदेशीर आहे, असा आक्षेप नोंदवला. त्याविषयीचे निवेदनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. याविषयी बोलताना मानसिंग पवार यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियाच बेकायदेशीर आहे. नवीन सदस्यांना मान्यता मिळालेली नाही. चेंज रिपोर्ट अद्याप मान्य झालेला नाही. त्यामुळे त्याविषयीचा आक्षेप नोंदवून बैठकीला हजेरी लावून बाहेर पडलो आहे.

उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी मंडळ कटिबद्ध

विरोधकांनी बैठकीत सहभाग घेतला. सह्या केल्या, निवडणुकीवर आक्षेप अर्ज दाखल केला आहे. सलग तिसऱ्यांदा मंडळाच्या सदस्यांनी आमच्यावर विश्वास टाकला आहे. आगामी काळात संस्थेचा विस्तार वैद्यकीय क्षेत्रात करण्यात येईल. त्याशिवाय इंग्रजी माध्यमांच्या शाळाही उघडण्याचा मंडळाचा प्रयत्न असणार आहे. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी मंडळ कटिबद्ध असणार आहे.
- सतीश चव्हाण, सरचिटणीस, मशिप्र मंडळ

Web Title: got a call from Sharad Pawar and the executive of the MSP Mandal's board was 'as it is'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.