भरभरून दिली राजशक्ती, उत्तरेकडे गेली ‘जलशक्ती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:20 PM2019-07-08T12:20:22+5:302019-07-08T12:21:27+5:30

मराठवाडा वर्तमान : पंतप्रधानांनी आता जलशक्तीची नवी बात ‘मन की बात’मध्ये केली आहे. अगोदर वाटले सारा देश ‘जलशक्ती’त समाविष्ट आहे; पण सरकारने उत्तरेच्या राज्यांनाच महत्त्व दिले. टेरीच्या अहवालानुसार मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटका हा जुन्या हैदराबाद संस्थानांचा भाग हवामान बदलाच्या तडाख्यात सापडला आहे; परंतु तरीही मराठवाड्यातील केवळ बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. जुलै महिना उजाडला तरी पाऊस नाही. हे कृष्णमेघांनो, आता मराठवाड्याला किमान तुम्ही तरी न्याय द्या.

got energized Rajashakti; 'Jal Shakti' went northwards | भरभरून दिली राजशक्ती, उत्तरेकडे गेली ‘जलशक्ती’

भरभरून दिली राजशक्ती, उत्तरेकडे गेली ‘जलशक्ती’

googlenewsNext

- संजीव उन्हाळे

हे पर्जन्यराजा, तू अगदी मनसोक्तपणे मुंबई-पुण्यावर बरसलास; पण त्यांनी संकट आल्यासारखे तोंड वाकडे केले. खरे तर जायकवाडीच्या कालव्यापाशी केवळ ५० सें.मी. पाणी पातळी आहे, हे त्यांना कुठे ठाऊक आहे. तिकडे तू सरीवर सरी शिंपत राहिलास. इकडेच का कंजूषपणा दाखविलास? ये वाजत-गाजत, गर्जत ये. भुईला भुईचे दान देण्यासाठी बळीराजाचे हात शिवशिवत आहेत. अरे तुझ्यावर तर आमची सारी जीवनस्वप्ने फुलारतात. गेल्या वर्षीच्या पाणीटंचाई आणि नापिकीत सर्वकाही करपून गेले होते. तरीही आशेची वात हृदयात बाळगून होतो. हलक्याशा पावसाने औंदा गवताच्या पातीवर दव जमू लागले. जणू बळीराजाची आसवेच! आभाळात लोंबणारे राखाडी काळ्या रंगाचे ढगच दाटून येतात. पाऊस येणार असे वाटत असतानाच पुन्हा पांढरे कोरडे ढग दिसतात. जणू वाकुल्या दाखवीत आहेत. गेल्या काही मोसमांपासून हे असेच सुरू आहे. ढग खरंच मराठवाड्यावर का बरसत नाहीत?

हे वरुणराजा, यावर्षी तर हवामान विभागालाच तू गुंगारा दिलास. मोठ्या पावसाचा अंदाज वर्तविलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात अवघा १.९९ मि.मी. पाऊस झाला. आतापर्यंत सरासरीच्या ७ टक्के कसाबसा पाऊस झाला. हवामान खाते हाय अलर्ट म्हणाले की, यंत्रणाही आता हाय रिलॅक्स होऊ लागली आहे. निवडणुकीच्या अगोदर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जलशक्ती योजनेचा उल्लेख केला होता. आता तर ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशव्यापी जलआंदोलनाचा संकल्प सोडला आहे. पहिल्या राजवटीत निर्मलग्राम अन् आता जलशक्ती. आता जलशक्तीच्या प्रचाराचे नगारे वाजू लागतील. या जलशक्तीतून मराठवाड्याला ओंजळभर पाणीही मिळणार नाही. देशातील २५५ जिल्ह्यांची जलशक्तीसाठी निवड झाली. त्यात महाराष्ट्रातील ८ जिल्हे आहेत. नेहमीप्रमाणे मराठवाड्यातून केवळ बीड जिल्ह्याची निवड केली गेली. इतर जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, बुलडाणा, अमरावती व नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे. ‘तळे राखी तो पाणी चाखी’ या म्हणीप्रमाणे ज्या ठिकाणचा पुढारी दमदार त्याच जिल्ह्यांची निवड व्हावी हा निव्वळ योगायोग समजावा. जलशक्तीसारखा कार्यक्रम हा मराठवाड्यात राबविणेच इष्ट होते. राज्याची जलयुक्त शिवार योजना केंद्राच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाच्या कोट्यवधी रुपयांवर चालली. आता केंद्राची प्रत्येक योजना जलशक्तीमय होणार असल्यामुळे राज्याच्या जलयुक्तला केंद्राकडून खडकूही मिळेल की नाही, शंकाच आहे. 

हे तुषार सागरा, कधीतरी सागरभर तुषार या प्रदेशावर पडू देत; अन्यथा नेहमीची थेंब थेंब गळती सुरूच आहे. यालाच वैज्ञानिक हवामान बदल म्हणू लागले आहेत. हवामान बदलाचे पहिले लक्षण म्हणजे बारीक थेंब. पावसाची वारंवारिता कमी होणे आणि एकदम तीव्रता वाढणे हे त्याचे दुसरे लक्षण. काल-परवा मुंबईवर सुमारे ५५० मि.मी. इतका पाऊस होऊन गेला. वर्षभराचा पाऊस एका दमात पडतो अन् नंतर गायब होतो, म्हणजे पावसाची सरासरी तर गाठली जाते; पण मोठा खंड राहतो. अर्थात, हवामान बदलामुळे सगळीकडेच ३० ते ३५ टक्के पर्जन्यमानात घट झाली आहे. ३,५०० मि.मी. पाऊस पडणाऱ्या कोकणामध्ये ही घट जाणवत नाही; पण ७५० मि.मी. सरासरी असलेल्या मराठवाड्यामध्ये त्याची तीव्रता अधिक अनुभवण्यास मिळते. २०१० पासून मराठवाड्यालाच हा अनुभव येत आहे. यावर्षीही जून कोरडा गेला. कदाचित जुलैही; पण नंतर एकदम पाऊस पडेल अन् सप्टेंबरनंतर गायब होईल. या सगळ्या परिस्थितीला शेतकऱ्यांनी तोंड कसे द्यावे, हा खरा कळीचा मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीतील पाणी शोषण्याचा दर कमीत कमी होत चालला आहे. आता हेच पाहा की १६ ते १८ महिन्यांपासून जमिनीने ओलावा पाहिलेला नाही. त्यामुळे थोडासा पाऊस झाला तर तो भूजलापर्यंत जाणारच नाही. शेवटी माती पाण्याने संपृक्त झाली तरच भूजलाची पातळी वाढते. इथे जमीन आर्ततेने पावसाची प्रार्थना करीत आहे. 

हे पर्जन्या, या सगळ्या परिस्थितीमुळे दोन पावसांमधील खंड वाढत चालला आहे. हा खंड १५ ते २१ दिवसांचा असेल, तर माती संपृक्त होत नाही. हवामान बदलाचे एक दुष्टचक्र आहे. दोन पावसांमधील खंड राहिल्यामुळे मातीची जलधारण क्षमता राहत नाही अन् पर्यायाने शेतीला आवश्यक असणारे पाणी मिळत नाही. पावसाची दोलायमानता ही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. जसे केवळ जालना जिल्ह्याचा विचार केला तर भोकरदन, जाफ्राबाद, जाफ्राबाद शेजारील देऊळगावराजाचा बुलडाणा जिल्ह्यातील भाग इथेच सतत जूनपासून पाऊस सुरू आहे; परंतु औरंगाबाद जिल्ह्याजवळील बदनापूर तालुका इथे आजही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई सुरू आहे. पेरणीपुरता पाऊस झाला असे समजून शेतकऱ्यांनी पेरणी केली. आता वाट बघणे सुरू आहे. पावसाचा पडणारा खंड हे हवामान बदलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. दमट हवामान झाल्यामुळे पुन्हा एकदा किडींचा प्रादुर्भाव होणे हे सहज शक्य होते. हवामान बदलामुळे केवळ शेतीव्यवस्थेलाच फटका बसतो असे नाही, तर मलेरियासारखे आजार सर्वदूर पसरतात. त्याला रोखणेही कठीण होऊन बसते. 
हे निसर्गराजा, आता तर हवामान विभागाने कोकण वगळता इतरत्र पावसाचा जोर ओसरल्याचे जाहीर केले. मराठवाड्यात केवळ पावसांच्या सरी पडतील, अशी शक्यता व्यक्त केली. हा आठ दिवसांचा अंदाज असला तरी आमचा जीव दडपला आहे. अजूनही दोन हजारांच्या वर पाण्याचे टँकर धावताहेत. अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहिली, तर प्रशासन कोलमडेल. सध्या रोजगार हमीवरील मजुरांची संख्या ८३ हजार असून, येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. केवळ जाफ्राबाद, भोकरदन, कन्नड, सोयगाव या पट्ट्यामध्ये पाऊस बरा पडला आहे; पण पाच वर्षांपासून कोरडे असलेले शेलूद येथील धामणा धरण फुटण्याच्या मार्गावर आहे. हीही तुझीच लीला. पाणी गळती लपविण्यासाठी अक्षरश: ताडपत्री लावण्यात आलेली आहे. या धरणाजवळ काही दुर्घटना घडली, तर आपण कोणाचीच गय करणार नाही, असे विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी बजावले आहे. आता नेहमीकरिता असे घडते की ‘गोरगरिबांच्या हाती नरोटी, प्रतापी मंडळींना कंत्राटे मिळती’, तसे जलशक्तीमध्ये होऊ नये, असे वाटते. हे सृष्टीला जीवदान देणाऱ्या वृष्टीराजा, तू पाहू नकोस आणखी अंत. फडफड फडफड घोषणा झाल्या. तडफड लोकांची थांबली नाही. जलयुक्त थांबले, आता जलशक्ती आली. राजकारण रोज नवे नवे. घोषणाही नव्या नव्या; पण खरं सांगू? तुझ्याशिवाय पर्याय नाही. एक दशकापासून चाललेली ही होरपळ तूच थांबवू शकतोस बाप्पा !

Web Title: got energized Rajashakti; 'Jal Shakti' went northwards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.