यावर्षी नापास झालो; पुढच्या वर्षी नक्कीच पास होऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 08:02 PM2019-03-08T20:02:56+5:302019-03-08T20:07:32+5:30
पुढच्या वर्षी पहिल्या दहामध्ये येऊ
औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणात औरंगाबाद शहराचा क्रमांक १२८ वरून २२० वर आला. यावर्षी महापालिका नापास झाली असली तरी पुढच्या वर्षी पास होऊ, असा दुर्दम्य आत्मविश्वास महापालिका सत्ताधाऱ्यांनी गुरुवारी व्यक्त केला. १२८ वरून थेट २२० व्या क्रमांकावर शहर जाण्यास कोणते घटक कारणीभूत आहेत, याची कारणमीमांसा करण्याबाबत मात्र सत्ताधारी, प्रशासनाने कोणताही निर्णय अजून तरी घेतलेला नाही.
१६ फेबु्रवारी २०१८ ते आजवर कचराकोंडीचा आढावा घेतल्यास पालिकेतील राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेतील बेबनाव याला जबाबदार असल्याचे दिसते. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीनेदेखील कचराकोंडीकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे दिसते. ९ मार्च २०१८ रोजी नगरविकास प्रधान सचिवांनी कचराकोंडी फोडण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केला. कचरा निर्मूलनात यशस्वी काम करणाऱ्या नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना येथे नियुक्त केले. वर्षभरात पालिका प्रशासनाने ज्या गतीने काम करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात अनेक अडथळे आले. परिणामी शहराचा रँक घसरला आहे.
या सगळ्या पिछाडीबाबत बोलताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, शहराची कचराकोंडी सोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केल्याने प्रक्रिया प्रकल्प उभारले जात आहेत. येत्या तीन महिन्यांत कचऱ्यावर प्रक्रिया सुरू होईल. यावर्षी क्रमांक मागे आला असला तरी नागरिकांनी नाराज होऊ नये. कचरा संकलन व वाहतुकीचे काम सुरू झाले आहे. वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी मिळालेला ७.५० कोटींचा निधी पडून आहे. त्यामध्ये मनपाला गुण मिळाले नाही. स्वच्छता अॅपच्या माध्यमातून नागरिकांनी चांगले मत नोंदविले आहे. प्रत्यक्षात पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नसून रस्त्यावर कुठेही कचरा दिसून येत नाही. नागरिकांना सोबत घेऊन पुढच्या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात पहिल्या दहामध्ये औरंगाबाद शहर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रँक घसरताच आढावा आणि दावे...
१५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे मशीन मार्चअखेरपर्यंत बसवून एप्रिलपासून त्यावर प्रक्रिया सुरू केली जाईल, असा दावा महापौरांनी केला. प्रशासनाने प्रक्रिया केंद्राच्या कामाचा आढावा घेतला. मनपाने चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव आणि कांचनवाडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी शेड उभारण्याचे काम सुरू आहे. एप्रिल महिन्यात कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कचरा साचून राहणार नाही. सुक्या कचऱ्याचे बेलिंग केले जात असल्याने कचरा कंपन्या घेऊन जात असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली. कांचनवाडी येथे कचऱ्यापासून येत्या तीन महिन्यांत गॅसनिर्मिती केली जाणार आहे. सध्या तेथील कचऱ्यावर बायोकल्चर प्रक्रिया करण्यात येत आहे. हर्सूल येथे ओपन टेक्नॉलॉजीद्वारे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी गुरुवारी निविदा उघडण्यात आली.