वाळूज एमआयडीसीत चोराकडून पाच दुचाकी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:37 PM2019-07-12T22:37:37+5:302019-07-12T22:37:49+5:30
चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या चोरट्यास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गुरुवारी कामगार चौकात जेरबंद केले.
वाळूज महानगर : चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या चोरट्यास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गुरुवारी कामगार चौकात जेरबंद केले. अजय वाणी असे चोराचे नाव असून, त्याच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार चौकात दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास एक इसम चोरीची दुचाकी विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती उपनिरीक्षक राहुल रोडे यांना मिळाली. पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कामगार चौकात चोरट्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला.
पोलिसांनी संशयित आरोपीला पकडण्यासाठी एक बनावट ग्राहक त्याच्याकडे पाठवून दुचाकी विक्रीचा व्यवहार करण्यास सांगितले. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास एक तरुण कामगार चौकात येताच बनावट ग्राहकाने त्यांच्याशी बोलण्याचे नाटक करुन त्यास गुंतवून ठेवले.
बनावट ग्राहकाने दुचाकीचा सौदा केल्यानंतर त्याने नंतर कागदपत्रे आणून देतो, असे सांगत तुमचे नातेवाईक किंवा मित्रास दुचाकी खरेदी करायची असल्यास आणखी दुचाकी असल्याचे सांगितले. दरम्यान, दुचाकी विक्रीचा व्यवहार होताच पथकाने त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. पण चाहुल लागताच तो दुचाकीवरुन पळून जाण्याच्या तयारीत असताना एका पोलिस कर्मचाऱ्याने दुचाकी आडवी लावून त्यास जेरबंद केले. त्याची चौकशी केली असता त्याने अजय वाणी (१९ रा.चांडगाव ता.वैजापूर) असे नाव असल्याचे सांगितले.