चोरून लग्न केले, आता बापाला कशाला पैसे मागता; दानवेंची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 05:14 PM2020-11-13T17:14:41+5:302020-11-13T17:19:02+5:30
आमचा उमेदवार, आमची जबाबदारी या धोरणाने सर्वांना काम करावे लागणार आहे.
औरंगाबाद : माझे कुटुंब, माझी जबाबदारी यातून मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडले पाहिजे. उठसूट केंद्राकडे पैसा मागता. चोरून लग्न केले. आता संसार चालवा. बापाला कशाला पैसे मागता, असा टोला लगावत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात केलेल्या टीकेला उत्तर दिले.
तापडिया नाट्यमंदिरात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. माजी मंत्री पंकजा मुंडे, आ. हरिभाऊ बागडे, विजया रहाटकर, आ. संभाजी निलंगेकर, उमेदवार शिरीष बोराळकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. दानवे म्हणाले, ट्रम्प हरले पण मोदी जिंकले. औरंगाबादमध्ये १७ प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांना एकेका वॉर्डात उमेदवारी देतो, हरले की घरी पाठवितो. यांनी चमक दाखविली पाहिजे, नुसते पदे घेऊन काय करणार? आमचा उमेदवार आमची जबाबदारी, हे आमचे धोरण आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. आमचा उमेदवार, आमची जबाबदारी या धोरणाने सर्वांना काम करावे लागणार आहे. कार्यकर्त्यांत हवा भरली असून, आता गाडी पंक्चर होणार नाही, असा दावा केला. त्यांनी संजय केणेकर , खा. डॉ. भागवत कराड यांना शालजोडे मारले. उमेदवार बोराळकर, रहाटकर, बागडे यांनी मार्गदर्शन केले. समीर राजूरकर यांनी सूत्रसंचालन केले. विजय औताडे यांनी आभार मानले.
...तर आम्ही कार्यकर्त्यांच्या जिवावर
प्रवीण घुगे शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. त्यांनी पक्षाच्या सांगण्यावरूनच अर्ज भरला. त्याचेच विरोधकांनी भांडवल केले. प्रदेशाध्यक्षाच्या बैठकीला वैयक्तिक कारणामुळे येता आले नाही. कार्यकर्त्यांनी सत्ता जाऊ देऊ नये. संघर्षाविना काही मिळालेले नाही. विरोधक कर्मचाऱ्यांच्या तर आपण कार्यकर्त्यांच्या भरवशावर आहोत. या मतदारसंघात जातीऐवजी शिक्षणाचा विचार होतो. असा हा मतदारसंघ आहे. बोराळकर आज विरोधी पक्षात आहेत, उद्या ते सत्तेत येतील. आजचे विरोधक उद्याचे सत्ताधारी होऊ शकतात. असे सुतोवाच माजी मंत्री मुंडे यांनी केले.