शिक्षण व लघु उद्योगांसाठी कॅनडा सरकारचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 09:31 PM2020-02-05T21:31:44+5:302020-02-05T21:32:35+5:30
व्यापारविषयक शिष्टमंडळ औरंगाबादच्या भेटीवर
औरंगाबाद : औद्योगिक वसाहतीमुळे औरंगाबाद शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. प्रचंड मेहनतीच्या बळावर येथील उद्योजक आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवीत आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन आम्ही येथील उद्योजकांना कॅ नडामध्ये कंपनी विस्तारासाठी मदत करणार आहोत. यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मदतीचा हात आम्ही देऊ, असा विश्वास कॅ नडाचे भारतातील उच्चायुक्त अँड्र्यू स्मिथ यांनी व्यक्त केला.
इंडो-कॅनडियन बिझनेस चेंबर (आयसीबीसी) एअर कॅ नडाच्या वतीने औरंगाबादेतील उद्योजक, तसेच विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी ‘ब्रँड कॅ नडा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ताज हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमात कॅनडामध्ये गुंतवणुकीच्या अनेक संधी व सहकार्याच्या बळावर उद्योग करणे किती सोपे होऊ शकते, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अँड्र्यू स्मिथ म्हणाले, ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाढणाऱ्या भारतात व्यापारविषयक संधी अनेक आहेत. विशेषत: औरंगाबादसारख्या शहरात व्यापार, शिक्षण, पर्यटन, तसेच वस्त्रोद्योगात मोठ्या संधी दिसून येतात. भारत सरकारने २०१९ मध्ये सुरू केलेल्या स्मार्ट सिटी योजनेतही औरंगाबाद शहराचा समावेश होतो. शैक्षणिकदृष्ट्याही हे शहर नावाजलेले आहे. त्यामुळे कॅ नडा सरकारतर्फे आम्ही शिक्षण आणि पर्यटन, उद्योग क्षेत्राशी संबंध मजबूत करू इच्छितो. तंत्रज्ञानातील प्रगती आणि स्वच्छतेच्या दृष्टीने झालेला विकास ही कॅ नडाची बलस्थाने असून, ‘ब्रँड कॅ नडा’मार्फ त जास्तीत जास्त उद्योजक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
यावेळी ‘आयसीबीसी’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नादिरा हामीद म्हणाल्या की, भारत आणि कॅ नडादरम्यान व्यापारी संबंध मजबूत करण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्न करीत असून, ही मोहीम संपूर्ण भारतभरात विस्तारणार आहोत. भारतातील सर्वाधिक आर्थिक घडामोडी महाराष्ट्रात घडत असून, औरंगाबादचे त्यात मोठे योगदान आहे. त्यामुळे या शहराशी आमचे व्यापारी संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा आहे.
या कार्यक्रमात स्थानिक लघु उद्योजक, विद्यार्थी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नाथ ग्रुप (फूड चेन), एक्स्पर्ट ग्लोबल सोल्युशन प्रा. लि. (आयटी), तसेच काही कन्सल्टिंग एजन्सीजचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
व्यापारविषयक संबंध वृद्धिंगत करण्याची मोहीम
भारतातील प्रमुख शहरांमध्ये व्यापारविषयक संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने ‘ब्रँड कॅ नडा’ ही मोहीम सुरू आहे. १३ जानेवारी रोजी हरयाणातील गुरुग्राम येथे या मोहिमेची सुरुवात झाली. त्यानंतर मंगळवारी औरंगाबादेत हा कार्यक्रम झाला. यापुढील टप्प्यात कॅ नडाचे हे शिष्टमंडळ पुण्यातील उद्योजकांची भेट घेणार आहे. यावेळी कॅनडाचे व्यापारविषयक विभागाचे अॅलन डिसुजा, अमित मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.