कॅन्सरग्रस्तांसाठी औरंगाबादचे शासकीय कर्करोग रुग्णालय ठरले आधार; अर्ध्या राज्यातील रुग्णांना मिळताहेत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 07:37 PM2018-08-31T19:37:51+5:302018-08-31T19:37:56+5:30
शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
औरंगाबाद : शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांवर उपचार केले जात असून, गत वर्षभरात २२,४८२ विविध प्रकारच्या कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कर्करोगाचे ४,२२४ रुग्ण वाढले आहेत. उपचारांती कर्करुग्ण बरा होऊन जगण्याचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे.
शासकीय कर्करोग रुग्णालय सुरूझाल्यापासून राज्यभरातून रुग्णांचा ओघ येथे वाढला आहे. इतर राज्यांसह परदेशातील रुग्णही येथे उपचारासाठी येत आहेत. गतवर्षी ९७४ विविध प्रकारच्या कर्करुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर यावर्षी १३६९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. गतवर्षी २०४८ महिलांवर उपचार केले, तर यंदा २५६९ महिलांना उपचार देण्यात आले. गतवर्षी १२४७ बालरुग्ण होते, ते यंदा १६१७ झाले. १५०३ डोळ्यांचा कर्करोग असलेल्या रुग्णांवर उपचार केले. तर यंदा १५१० रुग्ण झाले आहेत. हेडनेक अर्थात कान, नाक आणि घशाचा कर्करोग असलेले गतवर्षी २५०० रुग्ण होते ते यंदा ३ हजारांवर गेले आहेत.
विशेष म्हणजे शेवटच्या टप्प्यात असलेल्या १०५ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. गतवर्षी किरणोपचारासाठी ७९९ रुग्ण दाखल झाले होते. ते यंदा ८६६ दाखल झाले आहेत. केमोथेरपीसाठी ७,९८१ रुग्ण होते. यावर्षी २०७४ रुग्ण झाले असून, ही प्रक्रिया सुरूच आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे तंबाखूजन्य पदार्थ सेवनाने होणाऱ्या कर्करोगाचे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गतवर्षी १८,२५८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तर यंदा आतापर्यंत २२,४८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर कर्करुग्ण साधारणपणे पाच ते दहा वर्षे जगला तर त्याच्यावरील उपचार यशस्वी झाल्याचे म्हटले जाते, असे शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ.अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
दक्षतेसाठी जनजागृती अभियान
राज्याच्या विविध जिल्ह्यांत आणि तालुकास्तरांवर जनजागृती व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जात आहेत. कर्करोग उद्भवू नये, यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. पथनाट्य, पोस्टर्स प्रदर्शन, घोषवाक्य स्पर्धा, महाविद्यालयांमध्ये व्याख्यानाचे आयोजन, या आजारातून बरा झालेल्या कर्करुग्णाची मुलाखत आदींच्या माध्यमातून जनजागृती केली आहे.
कर्करोग उद्भवण्याची कारणे
लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, आनुवंशिकता, प्रदूषित आहाराचे सेवन, जंक फूड, बदलती जीवनशैली, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, कीटकनाशक फवारणी केलेले पदार्थ आदींमुळे समाजात कर्करुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे अभ्यासातून आढळून आले आहे.
ही आहे धोक्याची घंटा
शरीरात कुठेही गाठ असणे, शौचाच्या सवयी व वेळा बदलणे, शरीराच्या कोणत्याही छिद्रातून रक्तस्राव होणे, आवाज घोगरा होणे, स्त्रियांमध्ये मासिक पाळीत अतिरक्तस्राव होणे, शरीरावरील तिळाचा आकार वाढणे ही प्राथमिक लक्षणे आहेत. याचे वेळीच निदान झाले तर तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
अर्ध्या राज्याला उपचार
शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या माध्यमातून अर्ध्या राज्यातील रुग्णांना उपचार व सेवा दिली जात आहे. कर्करोगावरील उपचार आणि दक्षता या बाबींवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे.
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद.