सरकारने लेखी आश्वासन पाळले नाही; मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 05:12 PM2020-08-08T17:12:53+5:302020-08-08T17:17:12+5:30
मराठा समाजाच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप
औरंगाबाद: मराठा आरक्षणा आंदोलनात आत्मबलिदान देणाऱ्या ४२ बांधवांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी आणि प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे लेखी आश्वासन न पाळल्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी आजपासून क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन सुरू केले.
मराठा आरक्षण आंदोलनात आत्मबलिदान देणाऱ्या ४२ समाजबांधवांच्या वारसांना शासकीय नोकरी आणि प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे लेखी आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिले होतें. मात्र दोन वर्षानंतर ही या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. यामुळे संतप्त मराठा क्रांती ठोक मोर्चाने आज सकाळी क्रांतीचौकात सरकारविरुद्ध निदर्शने केली. मराठा समाजाच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी केला.
कोपर्डीच्या आरोपींना फासावर लटकवा, मराठा आरक्षणाच्या आधारे शासकीय नोकरीत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र द्या , अरबी समुद्रातील शिवस्मारक कामाला गती द्यावी, मराठा आरक्षण आंदोलनात दाखल १३ हजार ७०० गुन्हे रद्द करावे, सारथी संस्था अधिक बळकट करा, यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात आप्पासाहेब कुढेकर,भारत कदम, अनिल सपकाळ, सदानंद जाधव , विशाल वाळुंजे , पवन उफाड , रामेश्वर चोमटे , रविंद्र गावडे ,दत्ता वाळके आणि विनोद तारक आदिनी सहभाग घेतला.