शिवाजी प्राथमिक शाळेकडून शासनाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:29 PM2018-12-10T23:29:58+5:302018-12-10T23:30:42+5:30

खोकडपुरा येथील श्री शिवाजी प्राथमिकशाळेने संचमान्यता कायम राहून शिक्षकांची पदे टिकावीत, यासाठीच बनावट पटसंख्या दाखविल्याचा निष्कर्ष जि. प. च्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढला आहे. तसेच वेतन अनुदान, वेतनेतर अनुदान, शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तक आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राप्त अनुदान घेऊन शासनाची फसवणूक केल्याचेही अहवालात स्पष्ट केले.

Government fraud from Shivaji Primary School | शिवाजी प्राथमिक शाळेकडून शासनाची फसवणूक

शिवाजी प्राथमिक शाळेकडून शासनाची फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांनी तयार केला अहवाल : पदमान्यता कायम राखण्यासाठीच पटसंख्येची बनवाबनवी



औरंगाबाद : खोकडपुरा येथील श्री शिवाजी प्राथमिकशाळेने संचमान्यता कायम राहून शिक्षकांची पदे टिकावीत, यासाठीच बनावट पटसंख्या दाखविल्याचा निष्कर्ष जि. प. च्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढला आहे. तसेच वेतन अनुदान, वेतनेतर अनुदान, शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तक आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राप्त अनुदान घेऊन शासनाची फसवणूक केल्याचेही अहवालात स्पष्ट केले. माध्यमिक शिक्षण विभागाने माध्यमिक शाळेच्या बनवाबनवीचा अहवाल तयार केला आहे.
श्री शिवाजी  मोफत एज्युकेशन सोसायटी, कंधार संचलित खोकडपुरा येथील शिवाजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गोवर-रुबेला लस देण्यासाठी सोमवारी (दि.३) रांजणगाव येथून एकाच बसमध्ये १२२ विद्यार्थ्यांना आणले होते. या बसला अपघात झाल्यामुळे शाळेची बनवेगिरी समोर आली. ४ डिसेंबर रोजी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल आणि माध्यमिकचे डॉ. बी.बी. चव्हाण यांनी भेट देत शाळेची झाडाझडती घेतली होती. यात धक्कादायक माहिती मिळाली. प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथीच्या एकूण १२ तुकड्या आहेत. यात ३ डिसेंबर रोजी एकूण ३५२ पैकी २३० विद्यार्थी उपस्थित दाखविले आहे, तर ४ डिसेंबर रोजीच्या पाहणीत शाळेत केवळ २२ विद्यार्थीच आढळून आले. यातील २७४ विद्यार्थ्यांचे रहिवासी पत्ते हे रांजणगाव परिसरातील आहेत. प्राथमिक शाळेत १४ शिक्षक कार्यरत असून, त्यातील दोन शिक्षक विनाअनुदानित आहेत. त्यांना मान्यता देण्यात आलेली नाही, असेही प्राथमिकच्या अहवालात म्हटले आहे. माध्यमिक शिक्षण विभागानेही शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचा अहवाल तयार केल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी.चव्हाण यांनी दिली.

प्राथमिक शाळेतील त्रुटी
- शालेय परिवहन समितीची स्थापना नाही
- शालेय व्यवस्थापन समितीचे अभिलेखे उपलब्ध नाहीत.
- शाळेने पालक सभा घेतलेली नाही.
- पालकांना विद्यार्थ्यांच्या स्थलांतराबाबत लेखी सूचना दिलेल्या नाहीत.
- पाठ्यपुस्तकांचे योग्यपणे वाटप नाही.
-क्रीडा, अध्ययन, अध्यापन साहित्य उपलब्ध नाही.
- ग्रंथालय नोंदवहीवर १४४ पुस्तके पण विद्यार्थ्यांना एकही दिलेले नाही.
-१ लाख ६० हजार ८१८ रुपयांचे वेतनेतर अनुदान खर्चाबाबत अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध करून दिले नाही.

प्राथमिक शिक्षण विभागाने काढलेले निष्कर्ष
- खोकडपुरा येथील प्राथमिक शाळेत रांजणगाव, ता. गंगापूर
येथील २७४ विद्यार्थ्यांची नोंद.
- औरंगाबादेतील ७७ विद्यार्थी असून, तपासणीत २२ विद्यार्थीच हजर.
- शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा एकाच इमारतीत दोन सत्रात भरवतात. इमारतीची मालकी माध्यमिककडे.
- पहिली ते चौथीच्या प्रत्येकी ३ तुकड्या. प्रत्यक्षात प्रत्येक वर्गाच्या दोन तुकड्यांच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थी हजेरी पट तपासणीसाठी उपलब्ध. तिसºया तुकडीचे हजेरीपटच उपलब्ध नाही.
- शाळेने संचमान्यतेमध्ये शिक्षकांची पदे टिकविण्यासाठीच पटसंख्या खोटी दर्शविली.
- वेतन अनुदान, वेतनेतर अनुदान, शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तक आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राप्त अनुदान लाभ घेऊन शासनाची फसवणूक़
--शाळेची मान्यता रद्दची शिफारस होणार
श्री शिवाजी हायस्कूलमधील प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही शाळांची मान्यता रद्द करावी, अशी शिफारस शिक्षण संचालकांना केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाºयांनी दिली. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण म्हणाले, माध्यमिकचा अहवाल तयार केला आहे. त्याआधारे मान्यता रद्द करण्याची शिफारस येत्या दोन दिवसांत केली जाईल. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल म्हणाले, अहवाल अंतिम केला आहे. येत्या दोन दिवसांत शाळेची मान्यता रद्दचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल.

Web Title: Government fraud from Shivaji Primary School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.