खरीप हंगामाच्या नुकसान भरपाईपोटी मराठवाड्याच्या झोळीत शासनाकडून १७९१ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:56 AM2019-12-14T11:56:09+5:302019-12-14T12:09:06+5:30
अवकाळीच्या नुकसानीनंतर मदतीचा दुसरा हप्ता
औरंगाबाद : मराठवाड्यात अवकाळी पावसाने खरीप हंगाम हिरावून नेला. त्या नुकसानीपोटी शासनाने विभागाला ८१९ कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्याची तरतूद केल्यानंतर १३ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील १७९१ कोटी रुपयांचे अनुदान विभागाला देऊ केले आहे.१३ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाने शासनाला २९०४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणारा अहवाल दिला होता. त्यात पुन्हा ४५० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली. ३३५० कोटींपैकी आजवर २६८२ कोटी विभागाला अनुदान प्राप्त झाले आहे.
राज्यातील ३४ जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात दोन हजार ५९ कोटी ३६ लाख रुपयांची मदत जाहीर झाली होती. या मदतीच्या रकमेतून बँकेने कोणतीही इतर वसुली न करण्याचे आदेश आहेत. प्रत्येकी दोन हेक्टरपर्यंत मदत करण्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. दोन-चार दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुसऱ्या टप्प्यातील मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये समुद्रातील चक्रीवादळामुळे राज्याला अवकाळी पावसाने झोडपले. ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांमधील शेती पिकाचे नुकसान झाले. यात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील सुमारे ४४ लाख ३३ हजार ५४९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ४१ लाख ४९ हजार १७५ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आणि बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासकीय स्तरावर निर्णय झाला. त्यानंतर मदतीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचे शासनादेश निघाले आहेत.
मराठवाड्याला ३३५० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव विभागीय प्रशासनाने शासनाकडे पाठविला. राज्यपालांनी शेती पिकांना प्रतिहेक्टर आठ हजार रुपये, तर बहुवार्षिक पिकांना (फळबागा) हेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. टप्प्याटप्प्यानुसार विभागनिहाय आणि जिल्हानिहाय मदत वाटपास सुरुवात होईल. अंतिम पंचनाम्याच्या अहवालानुसार मराठवाड्यातील ४० लाख ४७ हजार २१० हेक्टर कोरडवाहू, ६९ हजार ४११ हेक्टरवरील बागायती, तर ३२ हजार ५५२ हेक्टरवरील फळबाग क्षेत्राचे नुकसान झाले आहे.