शासनाकडे १९ लाखांची थकबाकी
By Admin | Published: March 13, 2016 02:47 PM2016-03-13T14:47:35+5:302016-03-13T14:51:23+5:30
परभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अधिग्रहित केलेल्या विहीर आणि बोअरच्या मोबदल्याची १९ लाख ४४ हजार रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे थकली
परभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अधिग्रहित केलेल्या विहीर आणि बोअरच्या मोबदल्याची १९ लाख ४४ हजार रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे थकली असून दुष्काळाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता उदासीनतेच्या झळाही सहन कराव्या लागत आहेत.
जिल्ह्यात पाऊस मुबलक प्रमाणात झाला नसल्याने तीन वर्षांपासून ग्रामस्थ दुष्काळाचा सामना करीत आहेत. यावर्षी तर ही परिस्थिती अधिकच बिकट झाली असून परिसरातील जलसाठे आटले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात.
त्यातच ज्या विहिरी आणि हातपंपांना पाणी आहे, ते पाण्याचे स्त्रोत प्रशासनाकडून अधिग्रहित करणे आणि हे पाणी परिसरातील ग्रामस्थांसाठी उपलब्ध करुन दिले जाते. निर्माण झालेली टंचाईस्थिती लक्षात घेऊन या भागातील ग्रामस्थांनी देखील पुढाकार घेतला. परभणी तालुक्यातील २१ विहिरी आणि ५४ बोअर अधिग्रहणास परवानगी दिली. पाण्याचे हे स्त्रोत नोव्हेंबर महिन्यापासून ग्रामस्थांसाठी खुले करुन दिले आहेत.
विहीर अधिग्रहण केल्यानंतर या विहिरीचे व बोअरच्या पाण्याचा मोबदला संबंधित मालकाला प्रशासनाच्या वतीने दिला जातो. मात्र परभणी जिल्हा प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यापासून विहीर आणि बोअरचे देयके थकवली आहेत. काही ठिकाणी तर आॅगस्ट महिन्यांपासूनची देयके ग्रामस्थांना मिळाली नाहीत. दुष्काळाचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना मदत करण्याऐवजी प्रशासनाकडेच ग्रामस्थांची थकबाकी वाढत चालली आहे. सद्य:स्थितीला केवळ परभणी तालुक्यातील १९ लाख ४४ हजार १०० रुपयांची थकबाकी प्रशासनाकडे झाली आहे. ३८ गावांमधील लाभधारक शेतकऱ्यांना वेळेच्या वेळी अधिग्रहणाची रक्कम वितरित झाली नसल्याने ही थकबाकी वाढली आहे. सद्य:स्थिती लक्षात घेता प्रशासनाने लाभधारकांची थकबाकी तत्काळ अदा करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
मराठवाड्यातील दुष्काळ निवारण्यासाठी सरकार विविध घोषणा करीत आहे़ परंतु हा प्रकार केवळ कागदी घोडे नाचविण्याचा ठरत आहे़ परभणी जिल्हा भीषण टंचाईने होरपळत आहे़ काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याच्या भरोस्यावर बागायती पिके घेतली़ परंतु, निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेऊन ही पिके मोडून शेतकऱ्यांनी ग्रामस्थांना पाणी देण्याचे मोठे काम केले आहे़ अशा विहीर आणि बोअर मालकांचा मावेजा थकवून शासन जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे़
-अंजली बाबर, पं़स़ सदस्या