सरकारी रुग्णालयांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:05 AM2021-07-26T04:05:12+5:302021-07-26T04:05:12+5:30
औरंगाबाद : शहरातील सरकारी रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णांत घट झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या कोरोनाचे केवळ ९ रुग्ण ...
औरंगाबाद : शहरातील सरकारी रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णांत घट झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या कोरोनाचे केवळ ९ रुग्ण दाखल आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिली. तर घाटी रुग्णालयात २८ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. तसेच मेल्ट्राॅनमध्ये शहरातील १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जेरियाट्रिक्स सेंटरची प्रतीक्षा
औरंगाबाद : विभागीय वार्धक्यशास्त्र म्हणजे जेरियाट्रिक्स सेंटर औरंगाबादला व्हावे, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (घाटी) प्रस्ताव सादर केलेला आहे. मात्र, हा प्रस्ताव मार्गी लागून हे केंद्र होण्याची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे. या केंद्रासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रसूती वॉर्डात मांजरांचा वावर
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील प्रसूती वॉर्डांत गेल्या काही दिवसांपासून मांजरींचा वावर वाढला आहे. संधी साधून मांजरीने बाळ पळवले, तर त्याला कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न नातेवाइकांतून उपस्थित होत आहे. याकडे घाटी प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी होत आहे.
‘सिव्हिल’ला आयपीडी सुरू होण्याकडे लक्ष
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताच जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. परंतु उपचारासाठी दाखल होण्याची आवश्यकता असलेल्या रुग्णांना घाटीत जाण्याची वेळ ओढावत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आंतररुग्ण विभाग (आयपीडी) कधी सुरू होतो, याकडे रुग्णांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी १५ ऑगस्टपासून आयपीडी सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.