बदली होऊनही सोडवेना शासकीय निवासस्थाने
By Admin | Published: January 15, 2017 10:58 PM2017-01-15T22:58:33+5:302017-01-15T22:59:23+5:30
बीड येथील जिल्हा रुग्णालयाच्या द्वितीय व तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाची निवासस्थाने आहेत.
व्यंकटेश वैष्णव बीड
येथील जिल्हा रुग्णालयाच्या द्वितीय व तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाची निवासस्थाने आहेत. मागील तीन वर्षांपासून बदली झालेली असतानादेखील काही कर्मचारी शासकीय निवासस्थान सोडत नसल्याने नव्याने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थाने मिळत नाहीत. परिणामी नव्याने बीडला बदलून आलेल्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
येथील जिल्हा रुग्णालयांतर्गत एकूण ३६ शासकीय निवासस्थाने आहेत. बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळावी या उद्देशाने आरोग्य विभागाने निवासस्थाने बांधली आहेत. याशिवाय तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना रात्री-अपरात्री जिल्हा रुग्णालयात कर्तव्य बजावावे लागत आहे. अशा परिस्थितीत कर्तव्य बजावून घरी जाण्यासाठी सुरक्षित राहावे हा उद्देश यामागे आहे. मात्र, जुन्या कर्मचाऱ्यांकडून शासकीय निवासस्थाने सोडली जात नसल्याने नवीन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय घरे मिळत नाहीत.
चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी सचिन नांदूरकर यांना तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे निवासस्थान मागील अनेक वर्षांपासून दिलेले आहे. याला आरोग्य विभागातील संबंधित कर्मचाऱ्याने दुजोरा दिला आहे. जेव्हा शासकीय निवासस्थाने रिकामी होती, तेव्हा दिलेली आहेत, आता ती निवासस्थाने परत घेतली जातील, असेही संबंधित कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे.