गणेशोत्सव शासन नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने; पण उत्साहात होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 07:29 PM2020-08-19T19:29:44+5:302020-08-19T19:34:22+5:30
खबरदारी व सुरक्षितता लक्षात घेऊन नियमांची अंमलबजावणी करीत यंदा शहरात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा खबरदारी व सुरक्षितता लक्षात घेऊन नियमांची अंमलबजावणी करीत यंदा शहरात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यात रक्तदान शिबीर, प्लाझ्मादान जनजागृती, आरोग्य शिबीर घेण्यात येणार असल्याची माहिती गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर तुलशीबागवाले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
तुलशीबागवाले यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगद्वारे राज्यातील प्रत्येक गणेश महसंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यात त्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवणे, श्रींच्या लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करणे, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर घेणे, शक्यतो मंदिर, हॉलमध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करणे आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
सर्व नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने; पण उत्साहात साजरा करण्याचा आम्ही मुख्यमंत्र्यांना शब्द दिला आहे. हेच आवाहन आम्ही आता गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना व गणेशभक्तांना करीत आहोत. नंदकुमार घोडेले म्हणाले की, सार्वजनिक गणेश मंडळांनी शक्यतो मंदिरात किंवा हॉलमध्ये गणपती बसवावा व देखावा करू नये. सामाजिक आरोग्य उपक्रम राबवावे. कोरोनाची तपासणी शिबीर ठेवावे. यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, प्रफुल्ल मालानी, तनसुख झांबड, सुरेश टाक, सचिन खैरे आदी उपस्थित होते.
आगमन, विसर्जन मिरवणूक नाही निघणार
पृथ्वीराज पवार यांनी सांगितले की, यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. श्रींचे आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाही. शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात यावी.