सरकारने नोकरी द्यावी, नाहीतर चालते व्हावे : कपिल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 05:02 PM2018-10-30T17:02:33+5:302018-10-30T17:09:51+5:30
सरकारने या बेरोजगारांना नोकरी द्यावी, नाहीतर चालते झाले पाहिजे, असा इशारा आ. कपिल पाटील यांनी येथे दिला.
औरंगाबाद : राज्यातील सरकार खाजगीकरण, कंत्राटीकरण आणि आऊटसोर्सिंगच्या बाजूने आहे. शिक्षकांच्या रिक्त जागा तात्काळ भरल्या पाहिजे. त्यासाठी पात्रताधारक बेरोजगारांची मोट बांधून राज्यभर आंदोलन उभे करावे लागेल. सरकारने या बेरोजगारांना नोकरी द्यावी, नाहीतर चालते झाले पाहिजे, असा इशारा आ. कपिल पाटील यांनी येथे दिला.
डी.टी.एड., बी. एड. स्टुडंट असोसिएशनची शिक्षक भरतीसंदर्भात रविवारी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आ. पाटील बोलत होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष संतोष मगर, उपाध्यक्ष प्राजक्ता गोडसे, परमेश्वर इंगोले, सरचिटणीस प्रा. राम जाधव, प्रशांत शिंदे, प्रा. विजय भणगे, प्रा. नामदेव शिंदे, जमीर शेख आदींची उपस्थिती होती.
यावेळी आ. पाटील म्हणाले, शिक्षक भरतीसाठी पात्रताधारकांची रेंगाळेली भरती प्रक्रिया हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. जो जास्त पैसे देतो, त्याला नोकरी आणि ज्याला काही येत नाही, तो नोकरीत येतो, अशी वाईट अवस्था आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी असे तीनही विषय एकाच शिक्षकाला शिकविण्याची वेळ येत आहे. रिक्त असलेल्या जागा तात्काळ भरल्या पाहिजे. त्यासाठी मोठे आंदोलन उभे करावे लागेल, असे आ. पाटील म्हणाले.
संतोष मगर म्हणाले, गेल्या आठ वर्षांपासून पात्र असूनही नोकरीसाठी लढत आहे. नेमकी भरती केव्हा होणार, हे अजूनही स्पष्ट होत नाही.
नोकरभरतीचा हा गोंधळ गिनीज बुकमध्ये नोंदविला पाहिजे. शिक्षक भरतीसंदर्भात विधिमंडळात आवाज बुलंद झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक करताना प्रा. प्रशांत शिंदे म्हणाले, शिक्षक भरतीसंदर्भात शिक्षणसंस्था न्यायालयात गेल्या आहेत. संस्थांसंदर्भात न्यायालय निर्णय घेईल. तोपर्यंत जि.प.सह स्थानिक संस्थांतील भरती झाली पाहिजे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असे ते म्हणाले.
३० टक्के कपात
च्शिक्षण विभागात मागच्या दाराने ३० टक्के नोकरी कपात लावली जात आहे. शिक्षक भरतीबरोबर या कपातीला, खाजगीकरण, आऊटसोर्सिंग, कंत्राटीकरणालाही विरोध केला पाहिजे. तरुणांनी खाजगी क्षेत्रातील नोकऱ्याही मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही आ. कपिल पाटील म्हणाले.
२०१९ मध्ये सरकारला घालवावे लागेल
च्फोडा आणि झोडा ही संस्कृती प्रमाण मानणारे आज सत्तेवर आहेत. परंतु बेरोजगारांनी आपापसात भांडता कामा नये. आधीचे सरकार किमान ऐकून घेत असे, असे म्हणत राज्य सरकार आणि शिक्षणमंत्र्यांवर आ. पाटील यांनी टीका केली. २०१९ मध्ये या सरकारला घालवावे लागेल, असेही ते म्हणाले.