सरकारने त्यांच्या प्रकल्पांत स्थानिक उत्पादनच वापरावे
By Admin | Published: August 26, 2015 11:56 PM2015-08-26T23:56:57+5:302015-08-26T23:56:57+5:30
जालना : विविध कारणांमुळे जालन्यातील स्टील उद्योग अडचणीत सापडला असून, या उद्योगापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
जालना : विविध कारणांमुळे जालन्यातील स्टील उद्योग अडचणीत सापडला असून, या उद्योगापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारच्या विविध प्रकल्पांसाठी गुणवत्तेचे राज्यातच उत्पादित केलेले स्टील वापरावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती उद्योजक तथा रुपम स्टीलचे किशोर अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना दिली.
अन्य राज्यांतील वीजदराशी तुलना केली तर महाराष्ट्रात हे दर अधिक असल्याने उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्यंतरी तात्कालीन राज्य सरकारने उद्योगांसाठी रात्रीच्या वेळी वीजदरात अडीच रुपयांची सूट दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी ती कमी करुन दीड रुपयांवर आणण्यात आली आहे. यासह विविध प्रकारच्या करांमुळे स्टील उद्योग सध्या अडचणीतून जात आहे. जालन्यातील बहुतांश स्टील कंपन्या बंद झाल्या असून, परिस्थिती अशीच राहिली तर अन्य कंपन्याही बंद होण्याची भीती अग्रवाल यांनी व्यक्त केली. राज्य सरकार एकीकडे ‘मेक इन महाराष्ट्र’चा नारा देत आहे. तर दुसरीकडे राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण नसल्याचे अग्रवाल म्हणाले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही स्टील उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या असून, त्या सोडविण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. मात्र, लवकरात लवकर पाऊले उचलली गेली नाही, तर स्टील उद्योगापुढे भीषण संकट निर्माण होण्याचे संकेत अग्रवाल यांनी यावेळी दिले. सध्या हा उद्योग अडचणीत सापडल्याने अनेक कारखाने तीन पाळ्यात चालविणे जिकीरीचे झाल्याने ते कमी पाळ्यावर सुरु आहेत. परिणामी जालन्यातील कारखान्यांपैकी अनेक कारखाने बंद झाल्याने हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. सरकारने लवकरात लवकर यावर उपाययोजना आखण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे अग्रवाल यावेळी म्हणाले.