सरकारी व्हेंटिलेटर्स भाजप आमदाराच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:02 AM2021-05-18T04:02:17+5:302021-05-18T04:02:17+5:30
लोकमत इम्पॅक्ट : आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयाकडून गंभीर दखल औरंगाबाद : खासगी रुग्णालयांपाठोपाठ भाजप आमदाराने उभारलेल्या कोविड केअर ...
लोकमत इम्पॅक्ट : आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयाकडून गंभीर दखल
औरंगाबाद : खासगी रुग्णालयांपाठोपाठ भाजप आमदाराने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये सरकारी व्हेंटिलेटर्स पाठविण्यात आलेल्या प्रकाराची सार्वजनिक आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. सरकारी व्हेंटिलेटर्स वाटपाच्या या प्रकाराची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्निल लाळे यांनी दिली.
ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालये सक्षम करण्याऐवजी सरकारी व्हेंटिलेटर्स खासगी रुग्णालये आणि लोकप्रतिनिधींच्या रुग्णालयांसाठी देऊन आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन मोकळे होत आहे. लासूर स्टेशन येथे भाजप आ. प्रशांत बंब यांनी काही दिवसांपूर्वीच १०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारले. या ठिकाणी आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट आदी सुविधा आहेत. या ठिकाणी सरकारी ४ व्हेंटिलेटर्स देण्यात आले. हा प्रकार ‘लोकमत’ने १७ मे रोजी ‘खासगी रुग्णालयांनंतर सरकारी व्हेंटिलेटर्स गेले भाजप आमदाराच्या कोविड सेंटरमध्ये’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. शहरात आरोग्य उपसंचालक कार्यालय आहे. परंतु तरीही येथील अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता सरकारी यंत्रसामग्री खासगी रुग्णालये, लोकप्रतिनिधींच्या कोविड सेंटर्सला दिली जात असल्याचे दिसते. कारण याविषयी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. व्हेंटिलेटर्स वाटपाची चौकशी करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चौकशीतून नेमके काय समोर येते, हे आगामी दिवसांत स्पष्ट होईल.
-------
थेट कोणाला देता येत नाही
आरोग्य विभाग अशाप्रकारे कोणालाही थेट व्हेंटिलेटर देत नाही. जिल्हा शल्य चिकित्सक यांना व्हेंटिलेटर्स दिलेली आहेत. त्यांनी त्यांच्या पातळीवर व्हेंटिलेटर्स दिलेली असतील तर त्याची चौकशी केली जाईल. व्हेंटिलेटर्स देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आहे का, त्यासंदर्भात लेखी ऑर्डर आहे का, हे पाहिले जाईल.
- डाॅ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक
---------
फोटो ओळ
‘लोकमत’ने १७ मे रोजी प्रकाशित केलेले वृत्त.