खाजगी हॉस्पिटलला दिलेले सरकारी व्हेंटिलेटर परत आलेच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 06:26 PM2020-11-12T18:26:31+5:302020-11-12T18:34:44+5:30
अनेक खाजगी रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याचे कारण पुढे करून रुग्णांना परत पाठविण्याचा प्रकार झाला.
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटती असली तरी शहरातील विविध खासगी रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभागाचे तब्बल २६ व्हेंटिलेटर कार्यरत आहेत. हे व्हेंटिलेटर ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयात कधी कार्यान्वित होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाचे तब्बल २६ व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना देण्यात आले. हा प्रकार ‘लोकमत’ने १० ऑगस्ट रोजी ‘सरकारी व्हेंटिलेटर गेले खासगीमध्ये’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. या वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी व्हेंटिलेटर लावलेल्या रुग्णांकडून जर त्याचे पैसे आकारले तर व्हेंटिलेटर प्रशासनाकडून परत घेतले जातील, अशी सूचना केली.
खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी होती. अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर नसल्याचे कारण पुढे करून रुग्णांना परत पाठविण्याचा प्रकार झाला. या सगळ्यात जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाचे २६ व्हेंटिलेटर विविध ७ खासगी रुग्णालयांना देण्यात आले. गेल्या महिनाभरात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले की, शहरातील विविध खासगी रुग्णालयांना २६ व्हेंटिलेटर देण्यात आलेले आहेत. यातील एका रुग्णालयाने ५ व्हेंटिलेटर परत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे व्हेंटिलेटर आता परत येतील.
ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष
ग्रामीण भागांतील बहुतांश सरकारी रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्टरांअभावी व्हेंटिलेटर ठेवणे अवघड आहे. त्यामुळे तेथील व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना देण्यात आले. कन्नड, अजिंठा, सिल्लोड, पाचोड, वैजापूर आदी ठिकणी ऑक्सिजन बेडवरच (ओटू) भर देण्यात आला.