शासकीय टँकरच्या पाण्याचा ‘गोरखधंदा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:47 AM2018-08-28T00:47:28+5:302018-08-28T00:47:43+5:30

खंडाळावासियांचा घसा कोरडा : वाड्या, वस्त्यांऐवजी खाजगी विहिरीत भरणा

 Government water tanker 'Gorakhadhanda' | शासकीय टँकरच्या पाण्याचा ‘गोरखधंदा’

शासकीय टँकरच्या पाण्याचा ‘गोरखधंदा’

googlenewsNext

मोबीन खान
वैजापूर : तालुक्यातील खंडाळा गावात येणाऱ्या शासकीय टँकरच्या पाण्याचा गैरवापर होत असून काही पुढाºयांच्या कृपेने हे टँकर तहानलेल्या वाड्या, वस्त्यांवर न पाठविता स्वत:च्या खाजगी विहिरीत खाली करण्यात येत आहे. नंतर या पाण्याचा गोरखधंदा करण्यात येत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
तालुक्यातील खंडाळा परिसरात पाणीटंचाईचे भीषण स्वरूप येथील वाड्या-वस्त्यांना भेट दिल्यानंतर लक्षात येते. याठिकाणी ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे पाणी समस्येने रौद्ररूप धारण केले आहे. भवरबेंदजवळ असलेली आदिवासी वस्ती देखील पाणीटंचाईतून सुटलेली नाही. या वस्तीजवळ असलेल्या सुभाष सूर्यवंशी यांच्या विहिरीतून हे लोक पाणी भरतात. परंतु ही विहीरदेखील कोरडी पडली. पंचायत समितीने खंडाळा गावातील वाघचौरे वस्ती, भिंगी रस्ता, जेजूरकर वस्ती, मगरवस्ती, भवरबेंद, लेंडी वस्ती, कोल्ही रस्ता आणि थोरात वस्तीसाठी तीन महिन्यांपासून ३ टँकरने दिवसातून सहा खेपा पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र, येथील ग्रामपंचायतमधील काही सदस्यांनी ग्रामसेवकाला हाताशी धरून केवळ एकच टँकर वाड्या-वस्त्यावर पाठविण्यात येते. दोन टँकरचे पाणी शेती भिजवण्यासाठी वापरले जाते. लॉगबुकवर मात्र खोटी माहिती भरून दिली जाते.
काही सदस्यांनी या टँकरचे पाणी स्वत:च्या विहिरीत खाली करुन नंतर खाजगी टँकरमध्ये भरून या पाण्याचा गावात विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू केल्याची तक्रार येथील माजी जि.प.सदस्य सूरजनाना पवार यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होत नाही तोपर्यंत पाणीपुरवठा करणाºया टँकरचे देयक अदा करु नये. परिसरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईला नागरिक त्रासले असून भर पावसाळ्यात वणवण भटकण्याच्या त्रासाला कंटाळून अनेक ग्रामस्थांनी आपले बिºहाड पाणी उपलब्ध असलेल्या शेताकडे नेले आहे. स्वार्थी राजकारणामुळे गावचा विकास होत नसल्याच्या भावना गावकºयांनी व्यक्त केल्या.

प्रतिक्रिया
ग्रामस्थांनी गटविकास अधिकाºयांकडे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन खंडाळा येथील ग्रामसेवकाकडून लॉगबुक मागविले असून या प्रकरणाची आम्ही चौकशी सुरू केली आहे.
-के. पी. कड
पाणीपुरवठा अभियंता, पंचायत समिती

या प्रकरणी गटविकास अधिकाºयांना चौकशी करुन तातडीने अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे.
-प्रभाकर बारसे, उपसभापती, पंचायत समिती

फोटो.....भीषण दुष्काळाचे भयंकर वास्तव दर्शविणारे तालुक्यातील खंडाळा येथील आदिवासी वस्तीवरील हे दृश्य.अंगावर काटे उभे करणारे आहे.भर पावसाळ्यात घोटभर पाणी मिळवण्यासाठी जिवावर बेतणारी लढाई, हवालदिल झालेले डोळे,थरथरत्या हातात पाण्याचा हंडा,४० फूट खोल विहिरीतून पाणी काढण्यासाठी चाललेली जीवघेणी कसरत जणू रोजचेच झाले आहे.

Web Title:  Government water tanker 'Gorakhadhanda'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.