सुविधा दिली अन् नंतर विसरून गेले; ‘सिव्हिल’ रुग्णालयामधून किमोथेरपी सेंटरच झाले गायब...!
By संतोष हिरेमठ | Published: March 30, 2024 11:52 AM2024-03-30T11:52:36+5:302024-03-30T11:55:02+5:30
जिल्हा रुग्णालयातील स्थिती : किमोथेरपीसाठी शासकीय कर्करोग रुग्णालयाचाच आधार
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठा गाजावाजा करून किमोथेरपी सेंटर सुरू करण्यात आले. मात्र, आजघडीला हे सेंटर गायब आहे. सरकार सुविधा देते आणि नंतर विसरून जात आहे. गोरगरीब कर्करुग्णांना आजघडीला शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्थेचाच फक्त आधार आहे.
कर्करोगाच्या उपचारांत केमोथेरपी महत्त्वाची भूमिका बजावते. कर्करुग्णांच्या सुविधेसाठी २०१८ मध्ये मोफत किमोथेरपीची सुविधा जिल्हा रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी घेतला. या सुविधेमुळे कर्करुग्णांना छत्रपती संभाजीनगरात शासकीय कर्करोग रुग्णालयाबरोबर जिल्हा रुग्णालयातही किमोथेरपीचा उपचार घेता येणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी शहरातील चार कॅन्सरतज्ज्ञांशी तसा करार करण्यात आला. प्रशिक्षणही झाले. किमोथेरपीची औषधे उपलब्ध होताच किमोथेरपी युनिट सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात जिल्हा रुग्णालयातील किमोथेरपी सेंटरला टाळे लागलेले आहे. आता तर या किमोथेरपी सेंटरचा फलकही झाकून टाकण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे म्हणाले, मी येण्यापूर्वी किमोथेरपी सेंटर कार्यान्वित असेल. किमोथेरपीच्या स्थितीबद्दल आढावा घेतला जाईल.’
रुग्णसंख्या वाढण्याची भीती
गेल्या काही वर्षांत देशात कर्करुग्णांचे प्रमाण वाढत असून, २०२२ मध्ये १४ लाख ५० हजार एवढे कर्करुग्ण होते. ते २०२५ मध्ये वाढून त्यांची संख्या १५ लाख ७० हजार एवढी होईल, अशी भीती नॅशनल कॅन्सर रजिस्ट्रीच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
किमोथेरपी म्हणजे काय?
कॅन्सरच्या पेशींना मारून टाकण्यासाठी आणि कॅन्सर शरीराच्या अन्य भागात पसरू नये, यासाठी उपयोगात येणारी औषधप्रणाली म्हणजे केमोथेरपी. कॅन्सरची मुख्य गाठ काढल्यानंतर या रोगाचा अंश राहिलेल्या पेशींना दूर करण्यासाठी केमोथेरपीचा वापर केला जातो.
शासकीय कर्करोग रुग्णालयात रोज किती जणांना किमोथेरपी?
शासकीय कर्करोग रुग्णालयात दररोज जवळपास ६६ रुग्णांना किमोथेरपी दिली जाते. यात ५० ‘डे केअर’ स्तरावर आणि १६ जणांना वार्डात किमोथेरपी दिली जाते.