भिकेचे नव्हे तर सरकारला हक्काचे पाणी द्यावेच लागेल; पाणी प्रश्नांवर मराठवाड्यातील आमदार आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 04:48 PM2018-10-22T16:48:29+5:302018-10-22T16:51:31+5:30
सरकारला जायकवाडीला हक्काचे पाणी द्यावेच लागेल अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील आमदार औरंगाबादेत एकत्र आले.
औरंगाबाद : पाणी प्रश्नावर मराठवाड्यावरील होणारा अन्याय आता सहन करणार नाही, सरकारला जायकवाडीला हक्काचे पाणी द्यावेच लागेल अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील आमदार औरंगाबादेत एकत्र आले.
हक्काच्या पाण्यासंदर्भात शहरात मराठवाड्यातील आमदारांच्या एका बैठकीचे आज आयोजन करण्यात आले. यास १४ आमदारांची उपस्थिती होती. यावेळी आमदारांनी आक्रमक भूमिका घेत जायकवाडीत भिकेचे पाणी नको तर हक्काचे पाणी हवे आणि ते सरकारला द्यावेच लागेल अशी भूमिका घेतली.तसेच समन्यायी पाणी वाटपची तातडीने अंमलबजावणी करावी आणि मराठवाड्यातील अर्धवट सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची मागणी आमदारांनी केली.
मराठवाडा राजकीय नेतृत्वाबाबत कमनशिबी
मराठवाड्याच्या हक्काच्या लढाईचे रणशिंग फुंकण्यासाठी फक्त १४ आमदारांनी हजेरी लावली. राजकीय नेतृत्वाबात मराठवाडा नेहमीच कमनशिबी ठरलाय. पाण्याची लढाई मोठ रुप घेणार असे चित्र निर्माण होणार आहे.
जायकवाडीत अवघा ३३% जलसाठा
यंदा पावसाने दगा दिल्यामुळे जायकवाडी धरणात अवघा ३३.७२ टक्के साठा राहिला आहे. गतवर्षी जायकवाडी शंभर टक्के भरले होते. परंतु गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ६६.२८ टक्क्यांनी कमी साठा आहे. परिणामी आगामी काळात भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची चिन्हे आहेत.
मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून १७२ दलघमी म्हणजे ७ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय आठवडा उलटूनही घेण्यात आलेला नाही. या जिल्ह्यांतील नेत्यांच्या राजकीय दबावापोटी वरील धरणांतील पाणी जायकवाडीत सोडण्यास विलंब होत आहे. त्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदार एकत्र आले आहेत.
मुंबईत अधिकाऱ्यांची बैठक
जायकवाडीत वरील धरणांतून पाणी सोडण्यासंदर्भात मुंबईत आज बैठक होत आहे. या बैठकीस महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांच्यासह नगर, नाशिकचे अभियंते उपस्थित राहणार आहेत.