'तुमच्या जीवाला धोका होईल, असे कुठलेही पाऊल सरकार उचलणार नाही'- संजय शिरसाट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 03:36 PM2024-02-25T15:36:41+5:302024-02-25T15:37:50+5:30

'कुणीतरी आंदोलनाला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे.'

'Government will not take any step that will endanger your life' - Sanjay Shirsat | 'तुमच्या जीवाला धोका होईल, असे कुठलेही पाऊल सरकार उचलणार नाही'- संजय शिरसाट

'तुमच्या जीवाला धोका होईल, असे कुठलेही पाऊल सरकार उचलणार नाही'- संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर/जालना: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज(दि.25) अंतरवाली सराटीतील पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही लोकांना पुढे करुन मला संपवण्याचे कारस्थान होत आहे. फडणवीसांना माझा बळीच हवा असेल तर मी आज त्यांच्या सागर बंगल्यावर येतो, त्यांनी मला ठार मारा, असे आव्हान जरांगेंनी दिले आहे. यावर शिवसेना(शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलतना शिरसाट म्हणाले की, 'मला वाटते की, या आंदोलनाची दिशा बदलत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या सर्व बाजू स्पष्टपणे सांगितल्या आहेत. या सरकारने समाजाला 10 टक्के आरक्षणही दिले आहे. त्यांच्या पुढाकारानेच लाखो कुणबी समाजच्या नोंदी काढल्या गेल्या, साडेतीन लाख कर्मचाऱ्यांना कामाला लावून सर्वे केला गेला. आता काही लोक आंदोलनाला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, आरक्षण टिकणार नाही असे सांगत आहेत.' 

'गेल्यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा समाज मागास कसा, याचे पुरावे द्या, असे सांगितले होते. त्यामुळेच या सरकारने सर्वे करुन त्या सर्व गोष्टी क्लिअर केल्या आहेत. आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे. काही लोक समाजाची माथी भडकवण्याचे काम करत आहे. मी जरांगेंना विनंती करतो की, तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांशी बोला. ज्यांच्यावर तुम्ही टीका करत आहात, त्यांच्याशी चर्चा करा, चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करा,' असंही शिरसाट म्हणाले.
 
तसेच, 'जरांगेंनी आरोप केला की, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होतोय. असे कुणालाही जीवे मारण काय पोरखेळ आहे का? अशाप्रकारची हूकूमशाही कुणीही करणार नाही. त्यामुळे त्यांनी निश्चिंत राहावे. जरांगेंच्या तब्येतीची काळजी घ्या, असे हायकोर्टाने सांगितले आहे. त्यामुळे तिथले डॉक्टर सर्व गोष्टी चेक करुनच त्यांना ट्रीटमेंट देत आहे. एखादी साधी गोळीही देत असतील तर सर्व तपास केला जातो. तुमच्या जीवाला धोका होईल, असे पाऊल सरकार उचलणार नाही. कुठल्याही प्रकारचा गैरसमज मनात आणू नका,' असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Web Title: 'Government will not take any step that will endanger your life' - Sanjay Shirsat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.