रुग्णांना घरपोच आरोग्य सेवा मिळावी ही सरकारची तळमळ -मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:44 AM2017-12-10T00:44:07+5:302017-12-10T00:44:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लासूर स्टेशन : सर्वसामान्य रुग्ण अत्यावश्यक उपचारासाठी फिरूशकत नाही, त्यामुळे आरोग्य सेवेचा लाभ त्याला मिळत नाही, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लासूर स्टेशन : सर्वसामान्य रुग्ण अत्यावश्यक उपचारासाठी फिरूशकत नाही, त्यामुळे आरोग्य सेवेचा लाभ त्याला मिळत नाही, हे आमच्या लक्षात आले. आता रुग्णांना घरपोच सेवा मिळाली पाहिजे, ही आमची तळमळ आहे आणि हेच सरकारचे उद्दिष्ट आहे. एखादा रुग्ण येऊन आम्हाला भेटतो व तो म्हणतो की, तुमच्यामुळे माझा जीव वाचला, तो क्षण मुख्यमंत्री होताना होणा-या आनंदापेक्षा जास्त आनंद देणारा असतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
शनिवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील गीताबन येथे आ. प्रशांत बंब यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आरोग्य व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सराला बेटाचे मठाधिपती ह.भ.प. रामगिरी महाराज, वेरूळ येथील महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, अमेर साहब, कैलासगिरी महाराज, डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या महाआरोग्य शिबिरात एक लाख तीस हजारांहून अधिक रुग्णांनी तपासणी करून घेतली. त्यासाठी देशपातळीवरील नामांकित मुख्य व इतर १७५० डॉक्टरांचे पथक सकाळी सात वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यरत या महाशिबिरात परिश्रम घेत आहे.
किरकोळ आजारावरील रुग्णांवर जागेवरच औषधोपचार करण्यात आला, तर गंभीर आजार असणाºयांना पुढील संदर्भसेवा ठराविक नियोजनानुसार करण्यात येणार आहे.
एक ते नऊ डिसेंबरदरम्यान चाललेल्या या शिबिराच्या यशस्वीतेसाठी आरोग्यदूत तथा समन्वयक रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या यांच्यासह १७ समित्या तयार करण्यात आल्या होत्या. त्यांच्यात दीड हजार कार्यकर्ते, स्वयंसेवक होते.
गिरीश महाजन यांनी बंब यांनी आयोजित केलेला कार्यक्रम नजर लागण्यासारखा असल्याचे म्हटले, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोग्यमंत्री गिरीश महाजन व आ. बंब यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींमुळे मोठ्या आर्थिक खर्चाचे उपचार रुग्णांना सहजतेने उपलब्ध होत असल्याचे सांगून कौतुक
केले.
नाना, मी कमी खातो तरी माझे पोट मोठे...
आजार झालेल्यांच्या पाठीशी सरकार तर आहेच; परंतु आजार होऊ नये म्हणून जेवण गरजेपुरते करा, पोट ताणेपर्यंत खाऊ नका, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
यावर मिश्किलपणे टिपणी करताना मुख्यमंत्री म्हणाले की, नाना, मी कमी खातो तरी माझे पोट मोठे आहे, असे म्हणताच हंशा पिकला.
आजार होऊ नये म्हणून काळजी घ्या, स्वच्छतेच्या माध्यमातून परिसर रोगराईमुक्त करा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.