राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे प्राध्यापकांची बाजू मांडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:21 AM2018-04-17T01:21:26+5:302018-04-17T13:01:34+5:30
एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात घडलेल्या प्रकरणात कुलगुरूंनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त आदी ठिकाणी प्राध्यापकांची बाजू मांडावी, अशी आग्रही मागणी प्राचार्य, प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाविद्यालयांमध्ये परीक्षा घेताना विद्यार्थी किरकोळ कारणावरून धमक्या देतील. त्या धमक्यांना बळी पडून पोलीस गुन्हे दाखल करतील. तेव्हा परीक्षा कशा घेणार? असा सवाल करून एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात घडलेल्या प्रकरणात कुलगुरूंनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त आदी ठिकाणी प्राध्यापकांची बाजू मांडावी, अशी आग्रही मागणी प्राचार्य, प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात परीक्षेत कॉपी करताना पकडलेल्या विद्यार्थ्याने वर्ष वाया जाण्याच्या भीतीने पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी राजकीय संघटनांच्या दबावाला बळी पडून संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य आणि परीक्षेत पर्यवेक्षण करणाऱ्या प्राध्यापकांवर गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घेण्यासाठी प्राचार्य, बामुक्टो संघटनेच्या शिष्टमंडळाने विद्यापीठातील उच्च पदस्थ अधिका-यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी महात्मा फुले सभागृहात झालेल्या बैठकीत प्राचार्यांतर्फे डॉ. मजहर फारुकी, डॉ. वैशाली प्रधान यांनी बाजू मांडली. तर बामुक्टो संघटनेकडून डॉ. बाप्पासाहेब म्हस्के, डॉ. विक्रम खिलारे आणि डॉ. उमाकांत राठोड यांनी प्राध्यापकांना परीक्षेत येणा-या अडचणी मांडल्या. यावर परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर आणि कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी प्राध्यापक, प्राचार्य यांच्या बाजूने विद्यापीठ प्रशासन बाजू मांडेल, अशी ग्वाही दिली.
यांची उपस्थिती...
शिष्टमंडळात मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली प्रधान, रफिक झकेरिया महिला महाविद्यालयाचे प्राचार्य मझहर फारुकी, जेएनईसीचे प्राचार्य हरिरंग शिंदे, मौलाना आझादचे प्राचार्य रजा उल्ला खान, स. भु. कला व वाणिज्यचे प्र्राचार्य जे. एस. खैरनार, आयसीसीएमचे प्राचार्य दिलीप गौर, श्रेयसचे प्राचार्य एस. बी. पवार, सीएसएमएसचे डॉ. उल्हास शिंदे, एमआयटीचे प्राचार्य नीलेश पाटील, प्राचार्य संतोष भोसले, प्राचार्य सुनील देशमुख, प्राचार्या मुक्ती जाधव, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद उबाळे आदी उपस्थित होते.
परीक्षेच्या कामात अडथळा निर्माण करणा-या गैरप्रकारात प्राध्यापक, प्राचार्यांवर गुन्हे दाखल झाल्यास विद्यापीठ प्रशासन योग्य ती पावले उचलील. एमआयटी नर्सिंग महाविद्यालय हे नाशिकच्या आरोग्य विज्ञान महाविद्यालयाशी संलग्न आहे. यामुळे सर्व प्राचार्य, प्राध्यापकांनी त्या विद्यापीठाच्या कुलगुरूंना भेटावे, असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले. याच वेळी विद्यापीठ प्रशासन पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त आणि गृहविभागाकडे दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात प्राध्यापकांची बाजू मांडेल, असेही कुलगुरू डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले.