विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी दीक्षांत सोहळ्यास राज्यपाल येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 06:35 PM2019-12-26T18:35:13+5:302019-12-26T18:40:53+5:30
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी राज्यपालांची निमंत्रण देण्यासाठी मंगळवारी भेट घेतली.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी (६० वा) दीक्षांत सोहळा येत्या फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. या सोहळ्यास राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी परवानगी दिली. तसेच या सोहळ्याला कुलपती उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी राज्यपालांची निमंत्रण देण्यासाठी मंगळवारी भेट घेतली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात मंगळवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी हीरक महोत्सवी दीक्षांत सोहळ्यास उपस्थित राहण्यासह मागील पाच महिन्यांत विद्यापीठात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी राज्यपालांनी विद्यापीठाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केल्याचे विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सवी दीक्षांत सोहळा २००९ मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कार्यकाळात झाला होता. त्यानंतर हीरक महोत्सवी दीक्षांत सोहळ्याची तयारी परीक्षा विभागाने सुरू केली आहे. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या दीक्षांत सोहळ्यात आॅक्टोबर २०१८ आणि मार्च २०१९ या वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदव्या देण्यात येणार आहेत. पदव्युत्तर पदवीसाठी आवेदन मागविण्यात आले असल्याचेही प्रशासनाने कळविले आहे. तसेच पीएच.डी. पदवीसाठीही लवकरच अर्ज मागविण्यात येणार आहेत. तसेच या सोहळ्यासाठी पाहुणेही लवकरच ठरविण्यात येतील, अशी माहिती प्रभारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली.