राज्यपालांचा ताफा खड्डेमय रोडवरून रवाना
By Admin | Published: August 11, 2016 01:24 AM2016-08-11T01:24:11+5:302016-08-11T01:25:26+5:30
औरंगाबाद : राज्यपाल सी. विद्यासागर राव शहरात येणार असल्यामुळे जालना रोडची तातडीने डागडुजी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने काम हाती घेतले.
औरंगाबाद : राज्यपाल सी. विद्यासागर राव शहरात येणार असल्यामुळे जालना रोडची तातडीने डागडुजी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने काम हाती घेतले. परंतु रोडचे काम अर्धवट झाल्यामुळे राज्यपालांचा ताफा खड्डेमय रोडनेच गेला. सेव्हन हिल परिसरातील खड्ड्यांमुळे ताफ्यातील वाहने हळुवारपणे गेली. परिणामी जालना रोडवर सेव्हन हिलपर्यंत वाहतूक खोळंबली होती.
जालना रोडच्या खड्ड्यांवरून विधिमंडळात लक्षवेधी झाली. त्या लक्षवेधीचे उत्तर देताना विभागाने त्या रोडवर काम झाले नसल्याचे नमूद केले. परंतु २०१४ मध्ये त्या रोडसाठी विशेष निधी देऊन डांबरीकरण करण्यात आले होते. त्या कामाची डिफेक्ट लायबिलीटी कंत्राटदारांकडे आहे. त्यामुळे कंत्राटदारांकडून खड्डे बुजवून घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी काम सुरू करण्यात आले होते. परंतु पावसामुळे ते काम थांबविण्यात आले होते.
जालना रोड सेव्हन हिल उड्डाणपुलाच्या दुतर्फा वाहून गेल्यासारखा झाला आहे. दोन्ही बाजूंनी त्या रोडवरील सरफेस उखडले आहे. रोडवर टाकण्यात आलेले डांबर पूर्णपणे वाहून गेल्यामुळे खडी उघडी पडली असून, त्यावर वाहने घसरत आहेत. सेव्हन हिल ते मोंढानाका आणि हायकोर्टापर्यंत जालना रोड उखडला आहे. खडीचा बारीक भुगा झाला असून, धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा त्रास वाहनचालकांना होतो आहे.