‘गोविंदा... गोविंदा’चा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:06 AM2018-09-04T01:06:33+5:302018-09-04T01:06:54+5:30
‘गोविंदा, गोविंदा’चा प्रचंड जयघोष, ‘मैं हू डॉन, ‘झिंग झिंग झिंगाट’ अशा एकाहून एक सरस गीतांचे सादरीकरण आणि दहीहंडी फोडण्यासाठी रचणारे थरावर थर, अशा जल्लोषमय वातावरणात सोमवारी शहर अवघे गोविंदामय झाले. सहा ते सात थर लावण्यासाठी गोविंदा पथकांची स्पर्धा आणि युवकांच्या उत्साहामुळे वातावरण रंगले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘गोविंदा, गोविंदा’चा प्रचंड जयघोष, ‘मैं हू डॉन, ‘झिंग झिंग झिंगाट’ अशा एकाहून एक सरस गीतांचे सादरीकरण आणि दहीहंडी फोडण्यासाठी रचणारे थरावर थर, अशा जल्लोषमय वातावरणात सोमवारी शहर अवघे गोविंदामय झाले. सहा ते सात थर लावण्यासाठी गोविंदा पथकांची स्पर्धा आणि युवकांच्या उत्साहामुळे वातावरण रंगले होते.
शहरातील कॅनॉट प्लेस, बजरंग चौक, टीव्ही सेंटर चौक, शहागंज, गुलमंडी, निरालाबाजार, पुंडलिकनगर, आविष्कार कॉलनी येथे दहीहंडी महोत्सव सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. याठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी होणारा थरांचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ५१ वर्षांची गोविंदा पथकाची परंपरा असलेल्या जबरे हनुमान मंडळाने जाधवमंडी येथे पाच थर रचत दहीहंडी फोडून जल्लोष केला.
कॅनॉट प्लेस येथे स्वाभिमान क्रीडा मंडळातर्फे आयोजित दहीहंडी महोत्सव पाहण्यासाठी शेकडो आबालवृद्धांनी गर्दी केली होती. गोविंदा पथकांच्या गर्दीने कॅनॉट प्लेस परिसर गर्दीने फुलून गेला होता. जागा मिळेल तेथे गोविंदा पथकांच्या मनोऱ्यांचा थरार पाहण्यात प्रत्येक जण हरवून गेला होता. उत्तरमुखी हनुमान गोविंदा पथक (बुढीलाईन), जनसेवा गोविंदा पथक (जुना मोंढा), माऊली ग्रुप बिडकीन, जयराणा गोविंदा पथक (नवाबपुरा), रामराज्य गोविंदा पथक (छावणी), जयभद्रा राजाबाजार मित्र मंडळासह अनेक पथकांनी सलामी दिली. यावेळी ४० सेकंदांत सहा थर लावणाºया भवानीनगर गोविंदा पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी महोत्सवाचे अध्यक्ष प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, विशाल दाभाडे, कुणाल मराठे आदींची उपस्थिती होती.
आविष्कार कॉलनी, बजरंग चौक
आविष्कार कॉलनी येथे संस्कृती दहीहंडी महोत्सवात गोविंदा पथकांचा उत्साह दिसून आला. याप्रसंगी मयूर वंजारी, अविनाश पवार, चंद्रशेखर वानखेडे, सचिन अमोलिक, सचिन राऊत, मयूर विधाते आदी उपस्थित होते. बजरंग चौक येथे नेमो दहीहंडी महोत्सवात गोविंदा पथकांचे कौशल्य पाहण्यात नागरिक हरवून गेले. नगरसेवक शिवाजी दांडगे, गणेश नावंदर, नितीन खरात, प्रल्हाद पारटकर, राहुल खरात, दिगंबर खरात, प्रदीप ठाकरे आदी उपस्थित होते. याठिकाणी गोविंदा पथकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रबरी मॅट टाकण्यात आला होता.
टीव्ही सेंटर चौक
टीव्ही सेंटर चौकात चारही बाजूंनी नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. याठिकाणी धर्मरक्षक दहीहंडी महोत्सवाप्रसंगी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, एसीपी गोवर्धन कोळेकर, डॉ. सतीश साबळे, अभय शिंदे, एव्हरेस्ट शिखर सर करणारी मनीषा वाघमारे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सागर मगरे, स्वप्नील तांगडे, संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब थोरात, अध्यक्ष बद्रीनाथ ठोंबरे, नितीन अजमेरा, ज्ञानेश्वर शेळके यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित क्रीडापंटूचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.