पक्ष, चिन्ह पळविण्याचे पाप लपविण्यासाठी सरकारने आणल्या फसव्या योजना: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 01:54 PM2024-07-08T13:54:17+5:302024-07-08T13:56:27+5:30
मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण, शेतकऱ्यांना वीजबिल माफीसह विविध योजना त्यांनी जाहीर केल्या. या योजना फसव्या आहेत. पक्ष फोडण्याचे पाप लपविण्यासाठी या योजना जाहीर केल्या.
छत्रपती संभाजीनगर : ‘पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आलेल्या राज्य सरकारने शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडले. पक्षांची चिन्हे पळविण्याचे पाप केले. हे पाप लपविण्यासाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना वीजमाफीसारख्या योजनांचा भडीमार केला आहे. या योजना फसव्या असून, त्या केवळ विधानसभा निवडणूक होईपर्यंतच देतील,’ असा आरोप उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केला. छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपासवर रविवारी उद्धवसेनेचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. ‘जय भवानी, जय शिवराय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, उद्धव ठाकरे जिंदाबाद’च्या घोषणांनी मेळाव्याला सुरूवात झाली.
या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही येथे आपला खासदार पराभूत झाला, याचे शल्य आहे. येथे विजय मिळवला म्हणून भ्रमात असलेल्या मिंधेंना (मुख्यमंत्री शिंदे) सांगायला आलो की, विधानसभा निवडणुकीत संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिंकल्याशिवाय राहणार नाही. अतिआत्मविश्वासाने लढलो असेल. पण जाऊ द्या, लोकसभा निवडणुकीत हरलो तरी लढण्याची हिम्मत हरलो नाही. तीन महिन्यांनतर विधानसभा निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वाच्या अस्मितेची ही लढाई आहे. लाचार आणि हरामखोर, गद्दारांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही, अशी शपथ घेऊन आगामी निवडणूक लढायची असल्याचे ते म्हणाले.
राज्य सरकारच्या विविध योजनांवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण, शेतकऱ्यांना वीजबिल माफीसह विविध योजना त्यांनी जाहीर केल्या. या योजना फसव्या आहेत. पक्ष फोडण्याचे पाप लपविण्यासाठी या योजना जाहीर केल्या. शेतकऱ्यांना वीजमाफी काय देता, त्यांना दिवसा वीज द्या आणि त्यांची थकबाकी माफ करा, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले. विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, लक्ष्मण वडले यांचीही भाषणे झाली.
मतदारांना विचारा, आम्ही काय पाप केले?
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात खैरे यांच्या पराभवाचे शल्य असल्याने गटप्रमुखांनी मतदार याद्या घेऊन प्रत्येक मतदाराकडे जावे आणि आमचे काय चुकले, आम्ही काय पाप केले, जेणेकरून तुम्ही शिवसेनेचा पराभव केला? असा प्रश्न मतदारांना विचारण्याचे आदेश त्यांनी दिले. दोन वर्षे झाली, शहराचे नामांतर केले; मात्र अजूनही मतदारसंघ आणि विमानतळाचे नाव ते बदलू शकले नसल्याची टीका त्यांनी केली.