सरकारी कार्यालयांनी थकविले करोडो रुपयांचे बिल; महावितरण वीज तोडणार का?
By साहेबराव हिवराळे | Published: February 29, 2024 07:33 PM2024-02-29T19:33:19+5:302024-02-29T19:33:34+5:30
दोन महिन्यांचे वीजबिल थकले तरी सर्वसामान्यांचे कनेक्शन तोडले जाते.
छत्रपती संभाजीनगर : थकबाकी साचल्याने वसुली मोहिमेला वेग देत वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील थकबाकी ७,५०,३५४ ग्राहकांकडे ११२.२ कोटी रु. आहे. शहरातील शासकीय पाणीपुरवठा, मनपा, जि.प. या कार्यालयांकडे वीजबिल साचले आहे. या कार्यालयांची वीज कापणार काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
सरकारी कार्यालयांनी थकविले करोडो रुपये
पाणीपुरवठा, मनपा, जि.प. आणि सार्वजनिक पाणीपुरवठा योजना या कार्यालयांकडे सर्वांत जास्त बिल बाकी असून, त्यांचे कनेक्शन का कापले जात नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. सर्वाधिक थकबाकी कृषी अधिकारी कार्यालयाकडे आहे. या सर्वांचा एकंदरीत आकडा करोडोंमध्ये आहे.
एक हजार सर्वसामान्यांची वीज तोडली
दोन महिन्यांचे वीजबिल थकले तरी सर्वसामान्यांचे कनेक्शन तोडले जाते. मग कार्यालयांचे का तोडले जात नाही? अलीकडच्या काळात एक हजार नागरिकांची वीज कापली आहे.
सरकारी कार्यालयांवर कारवाई नाही
मार्च एण्डला सरकारी कार्यालयाचे वीज बिल जमा होणार आहे. त्यामुळे कारवाई होत नाही. त्यांचे बिल एकदाच आले तरी ते पूर्ण येते.
- महावितरण अधिकारी
सर्वसामान्यांचीच वीज का तोडली जाते?
कामासाठी दिवसभर बाहेर राबलो. सायंकाळी घरी आलो तर वीजपुरवठा तोडलेला होता.
-अरुण जाधव
नवीन मीटरसाठी चकरा
घरात वीज मीटर घेण्यासाठी संबंधितांच्या विनवण्या कराव्या लागतात. कोटेशन भरूनही नवीन वीज मीटर घेण्यासाठी महिना महिना चकरा माराव्या लागतात.
- मोहन भोळे