भोकरदन तालुक्यातून २० चोरीच्या दुचाकी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 07:04 PM2019-05-09T19:04:59+5:302019-05-09T19:05:07+5:30
दोन महिन्यांपासून करमाड परिसरात मोटारसायकल चोरून धुमाकूळ घालणारे चोरटे अखेर पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून ९ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
करमाड : दोन महिन्यांपासून करमाड परिसरात मोटारसायकल चोरून धुमाकूळ घालणारे चोरटे अखेर पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून ९ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. यातील मुख्य सूत्रधार सुनील माणिक मोरे (२६) हा असून, मधुकर कारभारी गाडेकर व लक्ष्मण साहेबराव ढसाळ अशी चोरट्यांची नावे आहेत. तिघांविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाडगाव शिवारातील दोन लॉन्सवर दोन महिन्यांपासून लग्न समारंभ असलेल्या दिवशी मोटरसायकल चोरी जात असल्याच्या तक्रारींत वाढ झाली होती. त्या अनुषंगाने करमाड पोलिसांनी २७ एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास लॉन्सजवळ सापळा रचला. यावेळी बनावट चावीचा वापर करून ईश्वर राजेंद्र उकर्डे यांची (एम एच २०० डी पी ८२११) दुचाकी चोरून नेताना सुनील माणिक मोरे हा दिसून आला.
यावेळी पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपले साथीदार मधुकर कारभारी गाडेकर (रा. देऊळगाव ताड ता. भोकरदन) लक्ष्मण साहेबराव ढसाळ (रा. बोरगाव तारु ता. भोकरदन जि. जालना) यांच्याकडे काही दुचाकी ठेवल्याची कबुली दिली. त्यावरून करमाड पोलिसांनी वरील ठिकाणी जाऊन ९ दुचाकी जप्त हस्त करुन करमाड येथे आणल्या.
त्याप्रमाणे चोरट्यांच्या माहितीनुसार अन्य काही ठिकाणांहून दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. मोटारसायकल चोरून आलेल्या पैशांतून करमाड येथे सोने खरेदी केल्याचे आरोपींनी सांगितले. पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक आदिनाथ रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सूतळे, सचिन राठोड, अनिल गायकवाड, सुरेश सोनवणे, ताराचंद घडे, आनंद घाटेश्वर, रविंद्र साळवे, साळवे करीत आहे.