वाळूजमध्ये चोरट्याकडून चोरीची कार हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:42 PM2019-07-19T23:42:01+5:302019-07-19T23:42:10+5:30
वाहन चोरी प्रकरणातील चोरट्यास वाळूज एमआयडीसी पोलिसांनी १६ जुलै रोजी जेरंबद करुन त्याच्या ताब्यातून एक कार, ६ मोबाईल व चोरीचे साहित्य जप्त केले.
वाळूज महानगर : वाहन चोरी प्रकरणातील चोरट्यास वाळूज एमआयडीसी पोलिसांनी १६ जुलै रोजी जेरंबद करुन त्याच्या ताब्यातून एक कार, ६ मोबाईल व चोरीचे साहित्य जप्त केले. दाऊद शेख असे या चोराचे नाव असून, त्याची कोठडीची मुदत संपल्याने त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे.
बजाजनगरातील केशव कल्याणे यांची कार चोरट्यांनी १० जुलै रोजी मध्यरात्री पळविली होती. ही घटना जयभवानी चौक ते कोलगेट चौक रस्त्यावरील एका हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. डीबी पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे कार व चोरट्याचा शोध सुरु केला. दरम्यान, दाऊद शेख उर्फ बब्बू आणि त्याचा मुलगा जिशान शेख हे बनावट नोंदणीच्या क्रमांकाची कार वापरत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. सदर व्यक्ती बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे असल्याचे समजले.
डीबी पथकाने चिखली गाठून १६ जुलै रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास जिशान शेख याला त्याब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच शेख याने बजाजनगरातून कार चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून एक बनावट क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार, ६ मोबार्ईल, तसेच वाहन चोरीच्या गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त केले.
आरोपी शेख याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस चौकशीत त्याच्यासोबत अन्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी हर्सूल कारागृहात केली आहे.