पदवीधर निवडणूक विश्लेषण- औरंगाबाद

By | Published: December 5, 2020 04:00 AM2020-12-05T04:00:24+5:302020-12-05T04:00:24+5:30

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी काँग्रेस) सतीश चव्हाण यांनी हॅट्‌ट्रिक साजरी केली. त्यांनी भाजपचे शिरीष बोराळकर यांचा ...

Graduate Election Analysis- Aurangabad | पदवीधर निवडणूक विश्लेषण- औरंगाबाद

पदवीधर निवडणूक विश्लेषण- औरंगाबाद

googlenewsNext

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी काँग्रेस) सतीश चव्हाण यांनी हॅट्‌ट्रिक साजरी केली. त्यांनी भाजपचे शिरीष बोराळकर यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. चव्हाण यांनी तब्बल ५८ हजार ९६ मतांनी विजय मिळविला. ही निवडणूक चव्हाण यांना जड जाईल, अशी चर्चा निवडणुकीपूर्वी वर्तविली जात होती. मात्र, चव्हाण यांचा विजय भाजपनेच सोपा केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोराळकर यांना उमेदवारी मिळवून दिली आणि इथेच भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला. बीडचे मुंडे समर्थक रमेश पोकळे यांनी बंडखोरी केली, तर माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी पक्ष सोडला. पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे केडरबेस असलेले घुगेही शांत राहिले. बोराळकर हे ब्राह्मण समाजाचे उमेदवार असून, ते फडणवीस यांनी लादल्याची भावना भाजपमधील मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये निर्माण झाली. त्याचा मोठा फटका बोराळकर यांना बसला. यापूर्वी श्रीकांत जोशी हे ब्राह्मण समाजाचे उमेदवार भाजपकडून याच मतदारसंघात निवडून आले आहेत. मात्र, त्यांच्यामागे गोपीनाथ मुंडे नावाची मोठी शक्ती होती. ती परिस्थिती बोराळकर यांच्या बाजूने दिसली नाही. प्रचाराच्या अखेरच्या काही दिवसांत गिरीश महाजन यांनी सूत्रे हाती घेऊन आर्थिक नियोजन केले. मात्र, त्याचा प्रभाव पडला नाही. मतदारसंघ खेचून आणण्याची हवा फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महाजन यांनी केली. मात्र, विजयाचा बार उडवता आला नाही. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून पक्षावर आणि विशेषत: फडणवीस यांच्यावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीचा फटकाही भाजपला बसल्याचे दिसत आहे.

सतीश चव्हाण यांच्या विजयाचे श्रेय महाविकास आघाडीचे दिसत असले तरी त्यांचा वैयक्तिकरीत्या मतदासंघात सातत्याने असणारा संपर्क आणि वावर याचा मोठा वाटा आहे. चव्हाण यांची ‘सच’ (सतीश चव्हाण) या बॅनरखाली स्वत:ची निवडणूक यंत्रणा आहे. ती त्यांनी याहीवेळी प्रभावीपणे वापरली. या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये भाजपविरोधात एकजूट दिसून आली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, अमित देशमुख, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, राजेश टोपे आदींनी चव्हाण यांच्या विजयासाठी मोठे काम केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप आणि विशेषत: फडणवीस छळत असल्याची भावना शिवसेनेमध्ये आहे. त्यामुळे फडणवीस यांचा पराभव करण्यासाठीच जणू शिवसेनेचे सर्व आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने प्रचारात सहभागी झाल्याचे दिसले. त्याचाही फायदा चव्हाण यांना झाला.

Web Title: Graduate Election Analysis- Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.