पदवीधर निवडणूक : पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही
By Admin | Published: May 28, 2014 12:45 AM2014-05-28T00:45:22+5:302014-05-28T01:13:17+5:30
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास आजपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराचा अर्ज आला नाही.
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास आजपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराचा अर्ज आला नाही. दुसरीकडे दिवसभरात १४ जण उमेदवारी अर्ज घेऊन गेले. निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. त्यानुसार या मतदारसंघात २० जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी उमेदवारी अर्जांचे मोफत वाटप केले जात आहे. उमेदवारांकडून पूर्ण भरलेले अर्ज ३ जूनपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. आज पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र, दिवसभरात एकूण १४ जण उमेदवारी अर्ज घेऊन गेले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण आणि भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचाही समावेश आहे. दोघांच्याही वतीने त्यांच्या प्रतिनिधींनी अर्ज नेल्याचे सूत्रांनी सांगितले. सार्वजनिक सुटी वगळता ३ जूनपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज दाखल करता येणार असल्याचे सांगण्यात आले. डिपॉझिट वाढले, वेळ घटली पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम वाढली आहे. आधी खुल्या प्रवर्गासाठी पाच हजार आणि राखीव प्रवर्गासाठी अडीच हजार एवढी अनामत रक्कम होती. निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जयस्वाल यांनीही सोमवारी पत्रकार परिषदेत वरीलप्रमाणेच अनामत रक्कम असल्याचे सांगितले. मात्र, आज ही रक्कम खुल्या प्रवर्गासाठी दहा हजार आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच हजार रुपये झाली असल्याचे सांगण्यात आले. पदवीधर निवडणुकीच्या जुन्या हँडबुकचा वापर केल्यामुळे ही गडबड झाल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ४ राहील, असेही सांगण्यात आले होते. मात्र, आता ही वेळही सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रासाठी जागेचा शोध प्रशासनाने मतमोजणी केंद्राच्या जागेचा शोध सुरू केला आहे. मतमोजणी केंद्रासाठी विभागीय आयुक्तांनी सोमवारी चार वेगवेगळ्या जागांची पाहणी केली. निवडणुकीची मतमोजणी २४ जून रोजी औरंगाबादेत होईल. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून मतपेट्या औरंगाबादेत आणण्यात येऊन या ठिकाणी त्यांची मोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय संजय जयस्वाल यांनी जागेचा शोध सुरू केला आहे. सोमवारी त्यांनी विद्यापीठातील दोन सभागृहे, शासकीय कला महाविद्यालय तसेच चिकलठाणा येथील एका जागेची पाहणी केली.