प्रशासनाच्या तयारीमुळे पदवीधरांचे मतदान सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:17 AM2017-12-05T00:17:30+5:302017-12-05T00:17:34+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर गटातील १० जागांसाठी चार जिल्ह्यांतील ५६ केंद्रांवरील ८४ बुथवर सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर गटातील १० जागांसाठी चार जिल्ह्यांतील ५६ केंद्रांवरील ८४ बुथवर सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले. पहिल्या टप्प्यातील अनुभवामुळे या टप्प्यात विशेष खबरदारी घेण्यात आली होती. यामुळे एकाही केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी सांगितले.
विद्यापीठातील अधिसभेतील पदवीधर गटासाठी सोमवारी मतदान झाले. यात एकूण २९ हजार ५०० मतदार मतदानासाठी पात्र ठरले होते. तर खुल्या प्रवर्गातील ५ आणि राखीव प्रवर्गातील ५ जागांसाठी तब्बल ५८ उमेदवार रिंगणात होते. यात सर्वाधिक उमेदवारांची गर्दी खुल्या प्रवर्गात होती. ५ जागांसाठी तब्बल ३३ उमेदवारांनी आपले नशीब अजमावले आहे. याशिवाय अनुसूचित जाती गटातील एका जागेसाठीही ९ उमेदवारांमध्ये लढत झाली. यामध्ये प्रा. सुनील मगरे आणि पंकज भारसाखळे यांच्यात थेट सामना झाला. तर प्रकाश इंगळे, प्रशांत पवार, अॅड. शिरीष कांबळे आणि डॉ. बाबासाहेब भालेराव यांनीही चांगलीच टक्कर दिलेली आहे. मागील टप्प्यात झालेल्या मतदानाच्या वेळी उस्मानाबाद येथील विद्यापीठ उपपरिसरातील मतदारांच्या मतपत्रिका दुपारनंतर पोहोचल्या होत्या. याशिवाय अनेक मतदान केंद्रांवर अप्रशिक्षित कर्मचाºयांमुळेही गोेंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मात्र यानंतर पदवीधरांच्या वेळी विद्यापीठ प्रशासनाने गंभीरपणे नियोजन करून सर्व घटकांचे सहकार्य घेऊन निवडणूक सुरळीतपणे पार पाडली. यात प्रत्येक मतदान केंद्रांवर केंद्रप्रमुख म्हणून प्राध्यापक, वर्ग-१ चे अधिकारी दिले. तसेच इतर कामांसाठीही पाच कर्मचारी प्रत्येक बुथसाठी दिले होते. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यासाठी निवडणूक निरीक्षक, सीसीटीव्हीची सक्षम यंत्रणा, कर्मचाºयांच्या राहण्याची व जेवण्याची चोख व्यवस्था केली होती. या सर्व बाबींवर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांचे बारकाईने लक्ष होते. कोणत्याही केंद्रातून तक्रार आली तर त्याची तात्काळ दखल घेण्यात येत होती. दिवसभर एकाही मतदान केंद्रावर गडबड झाली नसल्याचे डॉ. पांडे यांनी स्पष्ट केले.
७ डिसेंबर रोजी मतमोजणी
पदवीधर अधिसभेतील झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी सकाळी १० वाजेपासून होईल. मागील वेळी झालेला गोंधळ टाळण्यासाठी यावेळी २५ टेबल लावण्यात येणार असल्याचेही डॉ.पांडे यांनी सांगितले. मतमोजणीत गोंधळ होऊ नये, पुरेशा जागा उपलब्ध असावी, यासाठी मतमोजणी क्रीडा विभागाच्या सभागृहात होणार आहे.