समायोजनापूर्वी शिक्षकांना मिळणार दर्जावाढ
By Admin | Published: May 20, 2014 11:42 PM2014-05-20T23:42:06+5:302014-05-21T00:14:22+5:30
बीड : शिक्षकांच्या बदल्या करण्यापूर्वी समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे़ त्यासाठी शिक्षण विभाग वेगाने कामाला लागला आहे़
बीड : शिक्षकांच्या बदल्या करण्यापूर्वी समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे़ त्यासाठी शिक्षण विभाग वेगाने कामाला लागला आहे़ बुधवारी पदवीप्राप्त सहशिक्षकांना प्राथमिक पदवीधर म्हणून दर्जावाढ दिली जाणार आहे़ याशिवाय अतिरिक्त शिक्षकांचेही समायोजन होईल़ जिल्ह्यात मुख्याध्यापकांची ४६९ पदे मंजूर आहेत़ १४७७ प्राथमिक पदवीधर तर ६९८८ सहशिक्षकांची पदे देखील मंजूर आहेत़ प्रत्यक्षात मात्र, ४१० मुख्याध्यापक, ४९९ प्राथमिक पदवीधर, ७३९७ सहशिक्षक कार्यरत आहेत़ मंजूर पदांचा व सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांचा ताळमेळ घालण्यासाठी शिक्षण विभागाने दर्जावाढ देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार डीएडवर सहशिक्षक म्हणून रुजू झालेल्यांपैकी ज्यांनी पदवी घेतली आहे़ त्यांना प्राथमिक पदवीधर असा दर्जा देण्यात येईल़ शिवाय प्राथमिक पदवीधरांमधून मुख्याध्यापकपदी दर्जावाढ भेटणार आहे़ त्याची प्रकिया शिक्षण विभागाने सुरु केली आहे़ बुधवारी सहशिक्षकांना प्राथमिक पदवीधर म्हणून दर्जावाढ दिली जाणार असून त्यासाठी शिक्षकांना शिक्षण विभागात पाचारण केले आहे़ अतिरिक्त शिक्षकांचाही तिढा सुटणार जिल्ह्यात मागीलवर्षी १३७ अतिरिक्त शिक्षक होते़ रिक्त जागांवर त्यांचे समायोजन केल्याने हा आकडा आता ५७ वर आला आहे़ या ५७ शिक्षकांनाही सहशिक्षक म्हणून दर्जावाढ दिली जाईल़ त्यानंतर समायोजनाद्वारे त्यांना रुजू आदेश मिळतील, असे सूत्रांनी सांगितले़ सारे काही नियमानुसार शिक्षणाधिकारी (प्रा़) भास्कर देवगुडे यांनी सांगितले की, मंजूर व कार्यरत शिक्षकांच्या आकडेवारीत ताळमेळ घातल्याशिवाय बदल्या, पदोन्नत्या शक्य नाहीत़ त्यामुळे आधी दर्जावाढ देण्यात येईल़ कोणावरही अन्याय होणार नाही़ सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येईल, असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी) मंगळवारी शिक्षक ताटकळले दर्जावाढ देण्यासाठी जि़प़ च्या शिक्षण विभागाने मंगळवारी (दि़ २०) रोजी जिल्हाभरातून शिक्षक बोलावले होते़ शेकडो शिक्षक सकाळपासून शिक्षण विभागाच्या आवारात रेंगाळलेले पहावयास मिळाले़ रणरणत्या उन्हात हे शिक्षक तेथे उभे होते़ नंतर त्यांना उद्या या असा निरोप देण्यात आला़ या शिक्षकांना रिकाम्या हाताने परतावे लागले़ त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे़ दरम्यान, दर्जावाढीच्या काही याद्या तयार नव्हत्या़ त्यामुळे त्यांना परत पाठवावे लागले असे शिक्षण विभागातील अधिकार्यांनी सांगितले़