ग्रामपंचायत अन् व्यापारी गटात चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2017 11:55 PM2017-03-27T23:55:46+5:302017-03-27T23:59:52+5:30
उदगीर : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे़
उदगीर : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे़ त्यात सोसायटी गटावर अनेकांचे लक्ष असले, तरी ग्रामपंचायत व व्यापारी गटात मोठी चुरस निर्माण झाली आहे़
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होऊ घातलेली निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे़ २ एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने काँग्रेस व भाजप प्रणित दोन्ही पॅनलनी प्रचाराला गती दिली आहे़ काँग्रेस प्रणित पॅनलने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची सभा घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे़
तर दुसरीकडे भाजप प्रणित पॅनलनेही माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, भारत चामे, जिल्हा परिषद सदस्य बस्वराज पाटील कौळखेडकर, शंकरराव रोडगे, बस्वराज बिरादार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे, प्रा़ प्रवीण भोळे यांच्या उपस्थितीत मतदारांची सभा घेतली़ त्यात शेतकरी विकासासाठी भाजप प्रणित पॅनलच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ या सभेद्वारे काँग्रेस प्रणित पॅनलला शह देण्याचा प्रयत्न केला गेला़
दरम्यान, नेहमीप्रमाणे सोसायटी गटात सर्वाधिक चुरस पहायला मिळते़ मात्र, यावेळी व्यापारी व ग्रामपंचायत गटातही मोठी रंगत निर्माण झाली आहे़ व्यापारी गटात माजी सभापती शिवाजी हुडे यांचे चिरंजीव तथा पालिकेचे बांधकाम सभापती रिंगणात आहेत़ तर त्यांना शह देण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांचे चिरंजीव कैलास पाटील यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे़ या दोन उमेदवारांमुळे चुरस वाढली
आहे़
दरम्यान, ग्रामपंचायत गटातून काँग्रेस प्रणित पॅनलद्वारे मुन्ना पाटील रिंगणात आहेत़ ते सभापती पदाचे उमेदवार असल्याने यावेळी या गटातही लक्षवेधी लढत होत आहे़