ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा
By Admin | Published: May 5, 2017 12:05 AM2017-05-05T00:05:26+5:302017-05-05T00:07:03+5:30
मस्सा : सततच्या पाणीटंचाईला कंटाळलेल्या मस्सा खंडेश्वरी ग्रामस्थांनी गुरूवारी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला़
मस्सा : सततच्या पाणीटंचाईला कंटाळलेल्या मस्सा खंडेश्वरी ग्रामस्थांनी गुरूवारी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला़ ग्रामपंचायतच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांना धारेवर धरून सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी यावेळी लावून धरली होती़
कळंब तालुक्यातील मस्सा (खं) या गावची जवळपास १० हजार लोकसंख्या आहे़ गावाला गेल्या १५ वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे आज सकाळी १० वाजता येथील महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. त्यामुळे ग्रामपंचायतसमोर २०० ते ३०० लोकांचा जमाव जमला होता. यावेळी आंदोलन करणाऱ्या महिलाांसह ग्रामस्थांची सरपंच, उपसरपंच समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते़ उपस्थितांनी ‘पाणी द्या’ अशी मागणी लावून धरत ग्रामविकास अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना घेराव घालून धारेवर धरले होते़ गावातील भारत निर्माण योजना व्यवस्थित न राबविल्याने गावातील पाणीप्रश्न कायम आहे़ पाण्यासाठी होणाऱ्या भटकंतीला कंटाळलेल्या महिलांसह ग्रामस्थांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला़ यावेळी दीपक ताटे यांनी गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली़