दाभोळकर हत्याकांडातील संशयित शरद कळसकरच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 03:15 PM2018-09-28T15:15:47+5:302018-09-28T15:20:32+5:30
या घटनेमागे कोण आहे व ग्रामपंचायत जाळण्याने कारण काय, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
औरंगाबाद : दौलताबादपासून जवळच ऐतिहासिक दौलताबाद किल्याच्या पाठीमागे असलेल्या रामपुरी -केसापुरी ग्रुपग्रामपंचायत कार्यालयाला अज्ञात समाजकंटकांनी आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास आग लावली. या आगीत संपूर्ण जुने, नवीन अभिलेखे, संगणक, महत्वाची कागदपत्रे व काही नगदी पैसे जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दाभोळकर हत्याकांडातील संशयित आरोपी शरद कळसकर याचे हे गाव आहे. या घटनेमागे कोण आहे व ग्रामपंचायत जाळण्याने कारण काय, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
साधारण दोन हजार लोकसंख्येचे हे गाव असून दोन वर्षांपूर्वीच या ग्रामपंचायत कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले होते.
शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास गावातील काही शेतकरी शेतात पाणी भरण्यासाठी जात असताना त्यांनी ग्रामपंचायत जळत असल्याचे पाहिले. त्यांनी या घटनेची माहिती सरपंच शांताराम वाहुळ, ग्रामपंचायत सदस्य रामनाथ सुराशे, ज्ञानेश्वर पवार यांना दिली. त्यांनी तात्काळ ही माहिती दौलताबाद पोलीस ठाण्याला दिली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक सराफ, उपनिरीक्षक दिनेश सुर्यवंशी, विस्तार अधिकारी एम.सी. राठोड, उपविस्तार अधिकारी शिवाजी सोळुंकी, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडने यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे मोहन मुंगसे, हरिभाऊ घुगे, राजेंद्र निकाळजे, प्रशांत गायकवाड, दिनेश मुंगसे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत सर्व अभिलेखे व संगणक जळून खाक झाले होते.
ग्रामसेवक व्ही.पी. क्षीरसागर यांनी सांगितले की, या घटनेमध्ये अंदाजे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले. आगीत गावातील कराच्या रकमेसह महत्त्वाचे दस्तावेज, कागदपत्र, पूर्णअभिलेखे, संगणक, अभिलेखाचे कपाटे, फर्निचर साहित्य, जलशुद्धीकरणचे रिकामे जार जळून खाक झाले. या समाजकंटकांनी खुर्च्यांची मोडतोड करत सरपंच, उपसरपंच यांच्या नामफलकावर फुल्या मारल्या आहेत. संगणकाची जाळपोळ केल्याने गावातील जन्म, मृत्यू, नमुना आठ, महत्त्वाच्या नोंदी, जुना अभिलेख नष्ट झाला.
घटना नियोजित; विष टाकून कुत्रेही मारले
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार परिसरातील दोन ते तीन दिवसांपासून सहा ते सात कुत्रे विष टाकून मारण्यात आले. रात्रीसुद्धा दोन कुत्रे मारण्यात आल्याने गूढ वाढले आहे. ही घटना नियोजित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी व पोलीस तळ ठोकून आहेत. आग लावणाऱ्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.