जाहिरातींच्या पोस्टरने झाकले ग्रामपंचायत कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:07 AM2021-09-17T04:07:02+5:302021-09-17T04:07:02+5:30
लाडसावंगी : येथील ग्रामपंचायत इमारतीवर विविध राजकीय नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे शुभेच्छा फलक लटकावल्याने हे कार्यालय आहे की चावडी असा ...
लाडसावंगी : येथील ग्रामपंचायत इमारतीवर विविध राजकीय नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे शुभेच्छा फलक लटकावल्याने हे कार्यालय आहे की चावडी असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. शिवाय समोरच अतिक्रमण झाल्यानेही हे कार्यालय झाकोळले आहे.
लाडसावंगी गावात भव्य दोन मजली ग्रामपंचायत कार्यालय दुधना नदीकाठी बांधण्यात आलेले आहे. वरच्या मजल्यावर ग्रामपंचायतीसह तलाठी, कृषी साहाय्यक, मंडळ अधिकारी व इतर कार्यालयांची कामे एकाच ठिकाणी व्हावी म्हणून इमारतीत तशी सोय करण्यात आलेली आहे. याशिवाय उत्पन्न मिळावे यासाठी पहिल्या मजल्यावर व्यावसायिकांना भाडे तत्त्वावर गाळे काढण्यात आले. मात्र, या ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागात राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलक लावले आहे. यामुळे हे कार्यालय पूर्णपणे झाकलेले दिसते. नवख्यांना तर इमारतीजवळ येऊन कार्यालय कुठे आहे, याबाबत विचारणा करावी लागते. याचप्रमाणे तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक यांची कार्यालये दिसत नाहीत. ग्रामपंचायतीवरच्या बॅनर, पोस्टरमुळे ही चावडी तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय तळघरातील अवैध अतिक्रमणामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावरील बॅनर हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याविषयी सरपंच सुदाम पवार यांच्याशी संपर्क साधला असता, दोन दिवसांत बॅनर हटवितो, असे त्यांनी सांगितले.
चौकट
तळघरात अतिक्रमणाने पुराचा धोका
लाडसावंगी ग्रामपंचायतीच्या इमारतीला तळघरही असून, दुधना नदीला यदा कदाचित मोठा पूर आला तर तळघरातून पाणी वाहून जाण्याची व्यवस्थाही बांधकाम करताना करण्यात आलेली आहे. परंतु, ही इमारत आता अतिक्रमणधारकांचा अड्डा झाला आहे. शिवाय तळघरातही पक्के बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आल्याने मोठा पूर आल्यानंतर पाणी निघून जाण्यासाठी जागाच नसल्याने संपूर्ण इमारत वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
फोटो :
160921\img_20210915_112133.jpg
लाडसावंगी ग्रामपंचायत कार्यालयावर असे बॅनर, पोस्टर लावल्याने ही इमारत चावडी तर नाही ना असा प्रश्न पडला आहे.