वडवळमध्ये ग्रामसभा उधळली
By Admin | Published: August 17, 2014 12:27 AM2014-08-17T00:27:06+5:302014-08-17T01:04:23+5:30
वडवळ ना़ : स्वातंत्र्यदिनी येथे आयोजित ग्रामसभेत गारपिटीतील नुकसानीच्या अनुदानाचा वाद निर्माण झाला़ अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी
वडवळ ना़ : स्वातंत्र्यदिनी येथे आयोजित ग्रामसभेत गारपिटीतील नुकसानीच्या अनुदानाचा वाद निर्माण झाला़ अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांना हजर करा अशी मागणी केल्याने गोंधळ निर्माण झाला़ परिणामी ही ग्रामसभा तहकुब करण्यात येऊन २६ आॅगस्ट रोजी घेण्याचे ठरले़
शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती़ यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य, नागरिक व ग्रामविकास अधिकारी पी़ व्ही़ रेड्डी उपस्थित होते़ ग्रामसभेस प्रारंभ होताच गारपिटग्रस्त शेतकऱ्यांनी अनुदानाचा मुद्दा उपस्थित केला़ परिणामी ग्रामसभेत गोंधळ निर्माण झाला़
फेब्रुवारी- मार्चमध्ये झालेल्या गारपिटीत रबी पिकाबरोबरच टोमॅटो व इतर भाजीपाल्याचेही नुकसान झाले़ या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले असता तलाठी व महसूल मंडळ अधिकाऱ्यांनी ते काम पूर्ण केले़ हे पंचनामे वरिष्ठांकडे सादर करण्यात आले़ या पंचनाम्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांऐवजी अन्य शेतकऱ्यांचाच भरणा करण्यात आला आहे़
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कुठल्याही फळ झाडाचे नुकसान झाले नाही, ज्यांची जमीन पडिक आहे़ तसेच ज्यांच्या शेतात संपूर्णपणे ऊस आहे, अशा शेतकऱ्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश करण्यात आला़ त्यामुळे शासनाच्या वतीने सध्या अनुदान देण्याचे काम सुरु आहे़ चुकीच्या पंचनाम्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत़ अनुदान यादीतील १३५२ पैैकी ३१८ खातेदारांना २४ लाख ४२ हजार ५०० रूपयांचे अनुदान वाटप सुरु आहे़ या खातेदारांमध्ये एकाच घरातील तिघा-चौघा जणांचा समावेश आहे़ खरोखर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली़
मंजूर यादीची चौकशी करून यातील दोषींवर कार्यवाही करण्यात येईल़ अनुदानापासून वंचित असलेल्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे चाकूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले़(वार्ताहर)