‘ग्रामीण ॲप’चा नुसताच बोलबाला; तांत्रिक समस्यांचा गुंता सुटणार कधी? 

By विजय सरवदे | Published: January 4, 2024 11:16 AM2024-01-04T11:16:04+5:302024-01-04T11:16:04+5:30

डेव्हलपरने टेकले हात : ‘जिओ-टॅगिंग’चे भिजत घोंगडे

'Grameen App' is not working; When will the tangle of technical problems be resolved? | ‘ग्रामीण ॲप’चा नुसताच बोलबाला; तांत्रिक समस्यांचा गुंता सुटणार कधी? 

‘ग्रामीण ॲप’चा नुसताच बोलबाला; तांत्रिक समस्यांचा गुंता सुटणार कधी? 

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या कर्मचारी- अधिकाऱ्यांच्या हजेरीसाठी चार महिन्यांपूर्वी मोबाइल बेस ‘ग्रामीण ॲप’ सुरू करण्यात आले. सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्यालयासह पंचायत समितीस्तरावर हे ॲप कार्यान्वित झाले. परंतु, चार महिन्यांपासून तांत्रिक समस्यांमुळे ॲपची ‘रेंज’ ग्रामीण भागात पोहोचलेली नाही. परिणामी, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामपंचायत कार्यालये आणि पशुवैद्यकीय दवाखान्यांत या ॲपच्या माध्यमातून हजेरीची प्रक्रिया कधी सुरू होईल, याचे उत्तर प्रशासनाकडेही नाही.

या ॲपचा वापर केवळ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठीच नाही, तर त्रस्त नागरिकांना याद्वारे तक्रारदेखील करता येणार आहे. हे मोबाइल बेस ॲप लाँच करण्यापूर्वी त्याच्या कार्यप्रणालीच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर १५ ऑगस्टपासून जि. प. मुख्यालयातील सर्व विभाग तसेच तालुकास्तरावर सर्व पंचायत समित्यांमध्ये ॲपच्या माध्यमातून कर्मचारी- अधिकाऱ्यांची हजेरी सुरू झाली.

सध्या जि. प. मुख्यालयातील सर्व विभाग आणि तालुकास्तरावर पंचायत समित्यांमध्ये हे कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामपंचायत कार्यालये, पशुवैद्यकीय दवाखाने या ठिकाणी या ॲपची ‘जिओ- टॅगिंग’ची प्रक्रिया रखडली आहे. दुसरीकडे, ॲपमध्ये असलेल्या समस्यांचा गुंता सोडविण्यासाठी डेव्हलोपरही त्रस्त आहे. ‘जिओ- टॅगिंग’ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कर्मचारी- अधिकाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहूनच हजेरी द्यावी लागणार आहे. एखाद्याने ‘क्यू आर’ कोडचा फोटो वापरून कार्यालयाबाहेरून हजेरीसाठी चलाखी केल्यास संबंधितांची लबाडी ‘जिओ- टॅगिंग’मुळे क्षणात उघडी पडते व अनुपस्थिती दाखविली जाते.

अशी आहे ॲपची कार्यप्रणाली
कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेच्या आत यावे आणि वेळ संपल्यानंतरच कार्यालय सोडता यावे, यासाठी हजेरीच्या वेळी मोबाइलमध्ये ॲपच्या माध्यमातून ‘क्यूआर कोड’ स्कॅनिंग करावा लागतो. त्यानंतर संबंधितांना मोबाइलमध्ये आपला फोटो, वेळ व लोकेशन दिसते. त्यावर क्लीक केल्यानंतर हजेरी लागते. या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूदर्शन तुपे यांना मुख्यालयात बसून रोजच्या रोज कर्मचाऱ्यांच्या उपस्थित- अनुपस्थितीचा आढावा घेणे सहज शक्य होणार आहे.

Web Title: 'Grameen App' is not working; When will the tangle of technical problems be resolved?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.