स्वच्छतागृहाच्या अनुदानासाठी सात हजाराची लाच घेताना ग्रामसेवक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 05:27 PM2019-06-20T17:27:16+5:302019-06-20T17:29:06+5:30
ग्रामसेवकाने राहत्या घरी लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले होते
औरंगाबाद: शौचायल बांधकामाच्या अनुदानाचा धनादेश देण्यासाठी एका जणाकडून सात हजार रुपये लाच घेताना एकोड,पाचोडच्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. आरोपीकडून लाचेची रक्कम हस्तगत केली. हा सापळा बीड बायपास परिसरात २० जून रोजी सकाळी यशस्वी करण्यात आला.
दीपक बाबुराव क्षीरसागर(वय ४१)असे अटकेतील ग्रामसेवकाचे नाव आहे. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकोड,पाचोड गावाचा ग्रामसेवक असलेल्या क्षीरसागर याच्याकडे घारदोनचाही अतिरिक्त कारभार आहे. घारदोन येथील तक्रारदार यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरासमोर स्वच्छतागृह बांधले. शौचालय बांधकामासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. या अनुदानाचा धनादेश मिळावा,याकरीता तक्रारदार यांनी ग्रामसेवक क्षीरसागर यांच्याकडे अर्ज केला होता. १८ जून रोजी तक्रारदार हे क्षीरसागर यास भेटले तेव्हा त्याने अनुदानाचा धनादेश देण्याकरीता सात हजार रुपये लाचेची मागणी केली. एवढेच नव्हे तर बीड बायपास परिसरातील त्यांच्या राहत्या घरी लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
तक्रार प्राप्त होताच अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, उपअधीक्षक बी.व्ही.गावडे, मारूती पंडित सहायक उपनिरीक्षक बाबुराव वानखेडे, रवींद्र देशमुख, रवींद्र अंबेकर, मिलिंद इप्पर, आशिया शेख आणि चालक संदीप चिंचोले यांच्या पथकाने सापळ्याचे आयोजन केले. आज २० जून रोजी सकाळी तक्रारदार हे ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम घेऊन क्षीरसागर यांच्या निवासस्थानी गेले. तेव्हा क्षीरसागर याने तक्रारदार यांच्याकडून लाचेची मागणी करीत सात हजार रुपये घेतले. यावेळी तक्रारदार यांनी पोलिसांना इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी क्षीरसागरला लाचेच्या रक्कमेसह पकडले.