कोरोना काळात ५ गावांत आढळले ग्रामसेवक गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:05 AM2021-05-09T04:05:32+5:302021-05-09T04:05:32+5:30
-- औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढते आहे. १३६८ पैकी आतापर्यंत ११५३ गावांत कोरोनाचा संसर्ग पोहोचला. ...
--
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढते आहे. १३६८ पैकी आतापर्यंत ११५३ गावांत कोरोनाचा संसर्ग पोहोचला. सध्या ६९५ गावांत सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत ग्रामदक्षता समित्यांची महत्त्वाची भूमिका असून ग्रामसेवक, मुख्याध्यापक, तलाठी, शिक्षकांसह अधिकारी, कर्मचारी यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी अचानक दिलेल्या भेटीत ५ ग्रामसेवक गैरहजर आढळले. त्यातील दोघे बाधित होते तर दोघे कर्तव्यावर हजर नव्हते म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
गंगापूर, पैठण, कन्नड, वैजापूर आणि औरंगाबाद तालुक्यात अद्यापही तीन अंकी रुग्णवाढ दररोज होत आहे. तर या तालुक्यांत सर्वाधिक रुग्ण बाधित आतापर्यंत झाले. त्यातील गंगापूर तालुक्याचे आ. प्रशांत बंब यांनीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून गावपातळीवरील अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामसेवकांनी नेमणुकीच्या ठिकाणी म्हणजेच मुख्यालयी राहण्याची मागणी केली आहे. ७५ टक्के अधिकारी, कर्मचारी हे औरंगाबाद शहरासह इतर शहरातून ये-जा करुन काम करत आहेत. कोरोनाने थैमान घातलेले असताना गेल्या वर्षभरापासून अशा सूचना देऊनही त्याचे पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तर मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनीही कोरोना काळात मुख्यालयी राहण्याचे परिपत्रक काढले. तरीही गावात अधिकारी, कर्मचारी हजर राहत नसल्याचे तालुका संपर्क अधिकारी, तालुका टास्कफोर्सच्या निदर्शनास येत आहे.
--
३ ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिसा
--
जि. प. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुनील भोकरे यांनी अचानक काही गावांना भेटी दिल्या. त्यात शिवराई, चापानेर, सिरसगाव, बनशेंद्रा, खुल्लोड येथे ग्रामसेवक उपस्थित आढळून आले नाही. त्यातील सिरसगाव, बनशेंद्रा येथील ग्रामसेवक हे क्वारंटाईन असल्याने हजर नव्हते. उर्वरित तिघांना शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. असे पंचायत विभागाकडून सांगण्यात आले.
--
‘आज मी कोठे’ ग्रुपचा फायदा
---
सर्वेक्षणाच्या कामात गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने जि. प. अध्यक्षा मीना शेळके, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, सीईओ मंगेश गोंदावले यांनी ‘आज मी कोठे’ हे अधिकाऱ्यांना जीओटॅग फोटो टाकणे बंधनकारक केल्याने सर्व अधिकारी सुटीच्या दिवशीही काम करताना दिसत आहेत. तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडूनही नियमित कामाचा आढावा घेतला जात असून नेमलेल्या कर्तव्यावर उपस्थित नसलेल्यांवर कारवाईच्या सूचना तालुका स्तरावर दिलेल्या असल्याचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल म्हणाले.