ग्रामसेवक, सरपंचांना अपहार भोवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:06 AM2021-06-09T04:06:23+5:302021-06-09T04:06:23+5:30
चापानेर : चिंचखेडा खुर्द ग्रामपंचायतीत विविध कामांत ग्रामसेवक, सरपंचांनी संगनमताने अनियमितता केल्याचा प्रकार समोर आला. यासंबंधीचा चौकशी अहवाल नुकताच ...
चापानेर : चिंचखेडा खुर्द ग्रामपंचायतीत विविध कामांत ग्रामसेवक, सरपंचांनी संगनमताने अनियमितता केल्याचा प्रकार समोर आला. यासंबंधीचा चौकशी अहवाल नुकताच गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. याप्रकरणी ग्रामसेवक डी. बी. मिसाळ यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करीत त्यांचा पदभार ए. यू गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला.
कन्नड तालुक्यातील चिंचखेडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच पुंडलिक आबाराव कदम यांनी ग्रामपंचायतीला मिळालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमत करून अपहार केल्याचा आरोप केला. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे ३ नोव्हेंबर २०२० रोजी तक्रार केली. वरिष्ठ स्तरावरून यासंदर्भात दखल घेतली गेली. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. व्ही. कचकुरे यांनी चौकशी केली. संबंधित अहवाल गटविकास अधिकारी वर्ग एक डॉ. श्रीकृष्ण वेणीकर यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर डॉ. वेणीकर यांनी चिंचखेडाचे ग्रामसेवक डी. बी. मिसाळ यांना तत्काळ निलंबित करून १० मे २०२१ रोजी ग्रामसेवक ए. यू. गायकवाड यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला, तर पुढील कारवाईसाठी चौकशी अहवाल उपमुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सुपूर्द केला आहे. वरिष्ठ पातळीवर मिळालेल्या चौकशी अहवालावरून गावातील सरपंच व ग्रामसेवकांवर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
----
चौकशीत दिसून आलेला प्रकार
१) १४ व्या वित्त आयोगातील कामात ४७ हजार ७४० रुपये अपहार केल्याचे दिसून आले. सरपंच वैशाली राठोड यांचे स्वतःच्या मालकीचे गावात घर नसून देखील त्यांना दिलेले शौचालय प्रमाणपत्र चुकीचे आहे. शालेय व अंगणवाडी साहित्य खरेदी न करता खात्यातून ३ लाख ६५ हजारांची बिले सादर करून खरेदी केल्याचे दिसून आले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक १७ शौचालय लाभार्थींचे प्रत्येकी १२ हजार रुपयांचे चेक रक्कम जमा असताना दिले नाही. मनरेगा अंतर्गत दादाभाऊ आढाव या मृत व्यक्तीच्या नावे बिले काढली गेली. आप्पा कदम हे ९ एप्रिल २०१८ रोजी उपविभागीय कार्यालयात न्यायालयाच्या कामात होते. तरीही त्यांना कामावर हजर दाखविण्यात आले. कृष्णा पवार या व्यक्तीला दोन पाय नसताना त्यांना २८ दिवस कामावर दाखविण्यात आले.
----