राष्ट्रीय सणाच्या दिवशी राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्काराचा ग्रामसेवक युनियनचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 01:46 PM2018-01-16T13:46:05+5:302018-01-16T13:47:19+5:30
प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अथवा महाराष्ट्र दिनी घेतल्या जाणार्या ग्रामसभा वादळी ठरलेल्या आहेत. अनेक वेळा दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व खोटे गुन्हेही दाखल केले जातात. ग्रामसेवकांना जीव मुठीत धरून ग्रामसभा घ्याव्या लागतात. त्यामुळे येत्या २६ जानेवारी आयोजित राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.
औरंगाबाद : प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अथवा महाराष्ट्र दिनी घेतल्या जाणार्या ग्रामसभा वादळी ठरलेल्या आहेत. अनेक वेळा दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व खोटे गुन्हेही दाखल केले जातात. ग्रामसेवकांना जीव मुठीत धरून ग्रामसभा घ्याव्या लागतात. त्यामुळे येत्या २६ जानेवारी आयोजित राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.
यासंदर्भात ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष रमेश मुळे यांनी सांगितले की,राष्ट्रीय सणाच्या सुटीचा आनंद आम्हालाही घेता आला पाहिजे. नियमानुसार प्रत्येक आर्थिक वर्षात पहिली ग्रामसभा ही सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या आत घेणे बंधनकारक आहे. अर्थात ३० मे पूर्वी पहिली ग्रामसभा घेणे अपेक्षित असून १ मे अर्थात महाराष्ट्र दिनी ग्रामसभा घेणे बंधनकारक नाही. दुसरी ग्रामसभा ९ ते १५ आॅगस्टदरम्यान घेणे अपेक्षित आहे. तिसरी ग्रामसभा सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंचांनी ठरवून दिलेल्या तारखेत अर्थात नोव्हेंबर अखेर घेतली पाहिजे. चौथी ग्रामसभा ही २६ जानेवारी रोजी घेण्याच्या सूचना असतात; पण तो दिवस हा प्रजासत्ताक दिन असून राष्ट्रीय सण आहे. या दिवशी केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचार्यांना सुटी असते.
राष्ट्रीय सणाच्या सुटीचा आनंद ग्रामसेवकांनाही घेता आला पाहिजे. ध्वजारोहण आटोपल्यानंतर त्या दिवशी आयोजित केली जाणारी ग्रामसभा अन्य दिवशी घेण्याची राज्य कार्यकारिणीची मागणी आहे. राष्ट्रीय सणाचे महत्त्व कायम राहावे. या दिवशी गावात शांतता, समता, बंधूता व सलोख्याचे वातावरण कायम टिकून राहावे यासाठी २६ जानेवारी, १ मे व १५ आॅगस्ट रोजी आयोजित केल्या जाणार्या ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.
ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती
या संदर्भात ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष रमेश मुळे यांनी सांगितले की, आम्ही आज सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांना निवेदन सादर केले आहे. २६ जानेवारी, १ मे व १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रम निर्विघ्न पार पाडून त्या दिवशी ग्रामसभा घेणार नाहीत. अन्य कोणत्याही दिवशी ग्रामसभा घेण्यास आमची हरकत नाही.