‘जय ज्योती...जय सावित्री’च्या निनादात फुले जयंतीची शानदार मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:11 PM2019-04-11T23:11:20+5:302019-04-11T23:12:55+5:30
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सायंकाळी क्रांतीचौकातून शानदार मिरवणूक काढण्यात आली. घोडेस्वार, उंटस्वार, भालदार, चोपदार, वासुदेव व गोंधळी यांच्या सहभागाने व कार्यकर्त्यांच्या डोक्यावरील फुले पगडी व हातात पिवळ्या झेंड्यावर फुले यांची भव्य प्रतिमा यामुळे ही मिरवणूक नटली होती, सजली होती
औरंगाबाद : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सायंकाळी क्रांतीचौकातून शानदार मिरवणूक काढण्यात आली. घोडेस्वार, उंटस्वार, भालदार, चोपदार, वासुदेव व गोंधळी यांच्या सहभागाने व कार्यकर्त्यांच्या डोक्यावरील फुले पगडी व हातात पिवळ्या झेंड्यावर फुले यांची भव्य प्रतिमा यामुळे ही मिरवणूक नटली होती, सजली होती. महिला व तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. महात्मा फुले यांच्या अकरा फुटी पुतळ्याने व फुले, सावित्री व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सजीव देखाव्यानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अ. भा. माळी शिक्षण व समाजप्रबोधन संस्था, महात्मा फुले युवा दल व समस्त माळी समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे हे यंदाचे दुसरेच वर्ष होय. गतवर्षीपासून ही प्रथा सुरू झाली. यावर्षी तिचे स्वरूप भव्य झाले.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही मिरवणूक सायंकाळी सुरू झाली. नूतन कॉलनी, पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडीमार्गे ही मिरवणूक औरंगपुरा येथे येऊन विसर्जित झाली. अ. भा. माळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांताराम गाडेकर, महिला आघाडी राज्याध्यक्षा अनिता गायकवाड, विभागीय अध्यक्ष सोमनाथ जाधव, विश्वस्त जयंतराव गायकवाड, लता पवार, अनिता ताठे, अनिता देवतकर, संगीता पवार व सुभद्रा जाधव यांच्या संयोजनाखाली ही मिरवणूक काढण्यात आली. जयरामकाका साळुंके, एल. एम. पवार, डॉ. संजय गव्हाणे, राम पेरकर, शशिकला खोबरे, सरस्वती हरकळ, संगीता गाडेकर, प्रतिभा शेवाळे, हरिभाऊ पवार, शिवाजी गाडेकर, मुक्ताई महिला मंडळ व संत सावता मंदिर वसतिगृहाचे विद्यार्थी मिरवणुकीत चालत होते. महात्मा फुले युवा दलाचे देव राजळे, मोहित जाधव, अतुल राऊत, सीताराम विधाते, संजय ठोके, सुशील बोर्डे, संदीप हिंगे, सागर होले, महेश सत्रे, सचिन शिंदे, संतोष उगले, शिवराम राऊत, बाळकृष्ण बनसोड आदींनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. आमदार अतुल सावे, कदीर मौलाना, नगरसेविका कीर्ती आदींनी काही वेळ मिरवणुकीत सहभाग घेतला.
लक्षवेधी सजीव देखावा
रितेश डेंगळे याने सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, श्रेयस बल्लाळ याने सादर केलेल्या श्रेयस बल्लाळ, अंजली कोंडावार या मुलीने सादर केलेली सावित्रीबाई फुले, तनुजा कुलकर्णी हिने सादर केलेली राजमाता जिजाऊ, सौरभ कोरडे याने सादर केलेले राजर्षी शाहू महाराज व गणेश सावेकर याने सादर केलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सजीव देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महात्मा फुले यांचा अकरा फुटी पुतळा तर लक्षवेधी ठरला.
--------------