रेल्वे प्रवासात आजोबांचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:45 AM2018-04-29T00:45:02+5:302018-04-29T00:45:26+5:30
कन्नडमध्ये अंत्यसंस्कार : भांबावलेला नातू तीन तास एकटाच सोबतीला
कन्नड : कन्नड शहरातील समर्थनगर येथील रहिवासी शिवगीर भीमगीर गोसावी (६८) यांचे नासिक ते चाळीसगाव रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यावेळी त्यांच्यासोबत नऊ वर्षाचा नातू वेदांत होता. प्रवाशी व पोलिसांच्या सतर्कतेमुळे नंतर नातेवाईकांना बोलावून सोपस्कार पार पडल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.
आजोबा अचानक गप्प का झाले म्हणून त्याने हलवून पाहिले. परंतु ते काहीच प्रतिसाद देईना म्हणून वेदांत गोंधळला व त्याला रडू कोसळले. झाला प्रकार आजूबाजूच्या प्रवाशांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ रेल्वे प्रशासन व पोलिसांना कळविले. वेदांतने आजोबांच्या खिशातून मोबाईल काढून वडिलांचा आणि आईचा मोबाईल क्रमांक शोधून देऊन पोलिसांना दिला. त्यानंतर पोलिसांनी वेदांतच्या वडीलांशी संपर्क साधून आजोबांना चक्कर आले असल्याचे सांगितले व गोसावी यांना मनमाड येथील दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दोन- तीन तासांच्या या धावपळीत भांबावलेला वेदांत वारंवार फोन करून वडिलांना परिस्थितीची माहिती देत होता. वेदांतचे वडील तेथे पोहचेपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. तोपर्यंत आजोबांसोबत वेदांत एकटाच होता. वडील दिसताच त्याने हंबरडा फोडला. नातू, वडील आणि आजोबांची भेट झाली पण आजोबा जग सोडून गेले होते. आठ दिवस मुंबई येथील अभियंता असलेल्या मुलाकडे आजी -आजोबा दोन नातवंडांना सुट्टी होती म्हणून भेटावयास गेले होते. आजी आणि नात मुंबई येथे मुलाकडे सोडून आजोबा नासिक येथील मुलीकडे नातवासह एक रात्रीसाठी थांबले होते. सर्वांची भेट घेऊन ते परतत होते. दरम्यान काळाने यांच्यावर घाला घातला. ही भेट त्यांची अखेरची ठरली.
दरम्यान, गोसावी यांचा मुलगा सचिन यांनी मनमाड येथील दवाखाना व पोलिसांचे शासकीय सोपस्कार पार पाडले आणि मग मृतदेह घेऊन सायंकाळी कन्नड गाठले. रात्री आठ वाजेच्या सुमारास गोसावी यांच्या पार्थिवावर कन्नडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.