चंद्रकलाने केले आजी-आजोबाच्या कष्टाचे चीज
By Admin | Published: May 31, 2017 12:27 AM2017-05-31T00:27:23+5:302017-05-31T00:30:30+5:30
अणदूर : आईचं छत्र हरवल्यानंतर चार वर्षाच्या चंद्रकलाला घेवून आजी-आजोबा शिरगापूर येथे आले. पडेल ते काम करुन या दोघांनी आपल्या नातीला शिक्षण दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अणदूर : आईचं छत्र हरवल्यानंतर चार वर्षाच्या चंद्रकलाला घेवून आजी-आजोबा शिरगापूर येथे आले. पडेल ते काम करुन या दोघांनी आपल्या नातीला शिक्षण दिले. मंगळवारी बारावी परिक्षेचा निकाल लागल्यानंतर या दोघांचेही डोळे आनंदाश्रुंनी भरुन गेले होते. नात चंद्रकला कैलास जेठे वाणिज्य शाखेतून ८४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली.
येथील जवाहर महाविद्यालयात इयत्ता १२ वी मध्ये चंद्रकला कैलास जेठे शिक्षण घेत होती. चंद्रकलाच्या आईचे गाव तुळजापूर तालुक्यातील शिरगापूर तर वडीलांचे गाव सोलापूर जिल्ह्यातील आरळी (दह्याची). आई-वडीलांसोबत चंद्रकला आरळी येथेच राहत होती. मात्र ती चार वर्षाची असतानाच तिच्या आईचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आजोबा मारुती मेंंढापुरे हे तिला शिरगापूरला घेवून आले आणि तेथेच या आजी-आजोबांनी चंद्रकलाचा सांभाळ केला. आजोबांची आर्थिक परिस्थिती तशी नाजुकच. मात्र तरीही त्यांनी नातीने चांगले शिक्षण घ्यावे यासाठी प्रयत्न केले. मामा पवन मेंढापुरे यांचीही तिला साथ मिळाली. आपल्या शिक्षणासाठी आजी-आजोबासह मामा प्रयत्न करीत आहेत, शिक्षणाचा खर्च मोलमजुरी करुन भागवित आहेत याची जाणीव चंद्रकलाला होती. त्यामुळेच तिनेही शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले. अणदूर येथील कन्या वसतीगृहात राहुन तिने अभ्यास केला आणि आता कुठलाही वर्ग न लावता बारावी परिक्षेत वाणिज्य शाखेतून ८४ टक्के गुण मिळवून तिने गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले. चंद्रकलाचे सीए होण्याचे स्वप्न आहे. तिच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सी.ना. आलुरे गुरुजी, प्राचार्य संगमेश्वर जळकोटे, प्रा. वाघ, कोमल मुळे आदींनी तिचे कौतुक केले.