'आजीचे नातीला हळद लावणे राहून गेले'; जालना रोडवर भरधाव कारने दोन महिलांना चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 08:00 PM2020-03-07T20:00:38+5:302020-03-07T20:02:13+5:30
काकू आणि आजीचा जागीच मृत्यू
औरंगाबाद : जालना रोडवरील धूत हॉस्पिटलसमोर एका भरधाव कारने तीन पादचारी महिलांना जोरदार धडक दिल्याची घटना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी आहे. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.'
आशामती विष्णू गायकवाड ( ४० ), तुळसाबाई दामोधर गायकवाड (७० ) अशी मृतांची नावे आहेत, तर अहिल्याबाई गायकवाड (७० ) असे जखमी महिलेचे नाव आहे. मृत आणि जखमी महिला जालना जिल्ह्यातील देवठाण येथील रहिवासी आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आशामती विष्णू गायकवाड ( ४० ), तुळसाबाई दामोधर गायकवाड (७० ) व अहिल्याबाई गायकवाड (७० ) या देवठाण येथून नातीच्या लग्नासाठी शहरात आल्या होत्या. लग्न रविवारी असून आज नातीची हळद होती. तिघीही बसमधून उतरून रस्त्याच्या बाजूला थांबल्या. यावेळी चिखलठाणाकडून भरधाव वेगाने एक कार येत होती. दरम्यान धूत हॉस्पिटलसमोर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला उभ्या तिनही महिलांवर धडकली. यानंतर कार त्याच वेगात पुढे जात रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका टपरीवर धडकून थांबली. नागरिकांनी लागलीच जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोघींना तपासून मृत घोषित केले. दरम्यान, चालक फरार झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.