अनुदान वाटपात दिरंगाई; शाखाधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2016 12:54 AM2016-03-15T00:54:32+5:302016-03-15T01:02:51+5:30
नांदेड : दुष्काळी अनुदान वाटपामध्ये कामचुकार व वाटपास टाळाटाळ केल्याच्या कारणावरुन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कुरुळा शाखेचे विनायक बळीराम शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे
नांदेड : दुष्काळी अनुदान वाटपामध्ये कामचुकार व वाटपास टाळाटाळ केल्याच्या कारणावरुन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कुरुळा शाखेचे विनायक बळीराम शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती बँकेच्या विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून पहिल्या हप्त्यापोटी २०१ कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे प्राप्त झाले आहेत. पैकी १६० कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून त्यापैकी शेतकऱ्यांनी ५२ कोटींची रक्कम उचलली आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र कोरड्या दुष्काळाचे सावट असल्याने बळीराजाला या संकटामध्ये अर्थिक मदत तत्पर मिळावी, यासाठी जिल्हा बँकेमार्फत अनुदान वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरु करण्यात आली आहे. परंतु त्या वाटपाच्या कामातही काही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कामचुकारपणा केला जात असल्याने त्याचा फटका मात्र शेतकरी राजाला बसत आहे. त्यामुळे अनुदान वाटपात हयगय आणि निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाचे हत्यार उगारण्यात येत आहे. कंधार तालुक्यातील कुरुळा येथील शाखेचे शाखाधिकारी विनायक बळीराम शिंदे यांनी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम देण्यास टाळाटाळ तसेच इतर कारणामुळे त्यांना निलंबीत करण्यात आले आहे.
यापुढेही वाटपात कसुरपणा किंवा हयगय करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना बँक प्रशासन पाठीशी घालणार नाही, असेही विश्वसनीय सूत्रांकडून लोकतमशी बोलतांना सांगितले. अनुदान वाटपासाठी यापूर्वी महसूल प्रशासनाकडून वेळेवर शेतकऱ्यांची यादी बँकेकडे दिली नसल्याने त्यामुळे वाटपास विलंब होत आहे.
दुसऱ्या टप्यात जिल्ह्यासाठी ७९ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. सदर अनुदानाची रक्कम तहसील कार्यालयाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वर्ग करण्यात आले असले तरी रक्कम अद्याप बँकेत जमा झाली नाही, असेही सूत्राकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)